लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी जे मुद्दे घेऊन जनतेत गेले, त्यामुळे भाजपला बहुमत मिळाले नाही. विशेषतः उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सोबत जागावाटपापासून निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यापर्यंत राखलेला समन्वय आणि मुद्दे ऐरणीवर घेत केलेल्या प्रचाराला हे यश मिळाले आहे. कॉंग्रेस पक्षाने उत्तम कामगिरी केली असून पक्ष मजबूत करण्यासाठी राहुल यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्याचा प्रस्ताव मान्य केला,पण राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला असल्याने त्यांची मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे रणनीतीकार गेल्या दोन वर्षांपासून राहुल यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत जोडो यात्रा, संविधान, जातनिहाय जनगणना या मुद्यांवरून राहुल जनतेच्या प्रश्नांच्या जवळ आल्याचे रणनीतीकारांना वाटते. विरोधी पक्षनेतेपदानंतर राहुल यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यावरही सहमती केली जात आहे.
भारत जोडो यात्रेपूर्वी राहुल गांधी यांची प्रतिमा वेगळी होती. भाजपने आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी यात्रा काढून प्रतिमा बदलली. राहुल गांधींबद्दल असा समज निर्माण झाला, की ते जबाबदारीपासून दूर पळतात. ते पडद्याआडून पक्ष चालवू इच्छितात. त्यामुळेच राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. जेणेकरून ते जबाबदारीपासून दूर जातात, हा समज दूर करता येईल.