अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरातील सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी समाज उत्पती दिवस म्हणून दरवर्षी प्रमाणे यंदाही महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येत असून महेश नवमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष, मालपाणी उद्योग समूह संगमनेरचे प्रमुख, डॉ संजय मालपाणी उपस्थित राहणार आहेत. माहेश्वरी समाज ट्रस्ट व संलग्न संस्थांच्या वतीने १५ जुन रोजी महेश नवमी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ संजय मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असलेल्या उत्सवाचे पूजा यजमान गणेश मुंदडा व संगीता मुंदडा राहणार आहे. या सोबतच अनेक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे. अशी माहिती माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
माहेश्वरी भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया, प्रधानमंत्री विजयकुमार राठी, उत्सव प्रमुख शांतीलाल भाला, महिला मंडळाच्या सचिव ज्योती बियाणी, नवयुवती मंडळ अध्यक्ष सावी झंवर उपस्थित होते.दरवर्षी सकल माहेश्वरी समाज अनेक उपक्रमाच्या माध्यमातून हा महेश नवमी उत्सव साजरा करीत असतो. यावर्षी महेश नवमी पर्वात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महेश नवमीचा मुख्य सोहळ्याचा प्रारंभ शनिवार दि 15 जून रोज़ी सकाळी 9 वाजता महेश आरतीने होणार आहे. त्यानंतर सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी समाज ट्रस्ट व गीता परिवार अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख पाहुणे डॉ संजय मालपाणी यांची “जानो गीता, बनो विजेता” या विषयावर कार्यशाळा होणार आहे. दुपारी 4-30 वाजता राजराजेश्वर मंदिर येथून भगवान महेश यांची विविध देखावे व झांकी समवेत शोभायात्रा निघणार आहे.ही शोभायात्रा जयहिंद चौक,सिटी कोतवाली, टिळक रोड, ब्रजलाल बियाणी चौक,जुना कापड बाजार,जैन मंदिर,गांधी चौक,मनपा चौक, तहसील मार्गे माहेश्वरी भवन येथे पोहचून या शोभायात्रेचे समापन होणार आहे.
माहेश्वरी भवन येथे सायंकाळी 6-45 वाजता पूजा यजमान गणेश मुंदडा व संगीता मुंदडा यांच्या हस्ते भगवान महेश यांची पूजा अर्चना होऊन मुख्य महेश नवमी सोहळा सायंकाळी 7-30 वाजता होणार आहे. मंगळवार दिनांक 11 जून रोजी सकाळी 6 वाजता माहेश्वरी भवन येथे प्रगती मंडळाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता शासकीय महिला रुग्णालयात महिला रुग्णांना सौ.देवकीबाई विजयकुमार सोमाणी चेरीटेबल ट्रस्टच्या वतीने रुग्णांना फळ वितरण आणि सांयकाळी 6-30 वाजता माहेश्वरी भवन येथे महिला मंडळाच्या वतीने भक्ती मुळेच निराकार साकार होतो. हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक 12 जून रोजी माहेश्वरी नवयुवती मंडळाच्या वतीने सकाळी 7 वाजता माहेश्वरी भवन येथे हॅप्पी स्ट्रीट हा आगळावेगळा कार्यक्रम आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता आनंद बांगड परिवार व सौ प्रेमवती पोरवाल परिवाराच्या वतीने शासकीय सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना फळ वितरण तसेच सायंकाळी 5 वाजता अकोला माहेश्वरी समाज वरिष्ठ नागरिक महिला प्रकोष्ठच्या वतीने नारी सशक्तिकरण या विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता एक शाम महेश के नाम हां कार्यक्रम सौ निधि पवन मंत्री करणार आहे.
गुरुवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने माहेश्वरी भवनात विविध खेलकूद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दुपारी 4-30 वाजता अकोला माहेश्वरी समाज वरिष्ठ नागरिक प्रकोष्टच्यावतीने, कौटुंबिक संबंधात समाज माध्यमांचा वाढत चाललेला प्रभाव लाभदायक की हानिकारक या विषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 9-30 वाजता माहेश्वरी भवन येथे व्यवसाय व रोजगारची शाळा या विषयावर बिपीन धूत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे दुपारी 4-30 वाजता शालेय पारितोषिक व अन्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्कॉलरशिप अँड लॅपटॉप कमिटी पुणेचे अध्यक्ष डॉ श्याम चांडक राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून राधाकिशन तोष्णीवाल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल उपस्थित राहणार आहेत.
माहेश्वरी समाज ट्रस्ट व सलग्न संस्थांच्या वतीने आयोजित या स्पर्धा, कार्यक्रम, शोभायात्रा व मुख्य नवमी सोहळ्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माहेश्वरी समाज ट्रस्ट आणि संलग्न संस्थाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.