अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुंबई क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. T20 विश्वचषकातला भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमोल काळे अमेरिकेला गेले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांचं निधन झालं आहे.टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. अमोल काळे हे सामना पाहण्यासाठी न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर गेले होते. सामना संपल्यानंतर अमोल काळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले अमोल काळे यांचं नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आलं होतं. अमोल काळे यांचं क्रिकेटशी गहिरं नातं आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील सर्वश्रुत आहे. आज त्याच अमोल काळे यांच्या निधनाचं वृत्त आलं आहे.
अमोल काळे हे नागपूरकर होते. नागपूरच्या अभ्यंकर नगर भागात ते वास्तव्य करत होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. अमोल काळेंचे वडील किशोर काळे यांचं जे. के. इलेक्ट्रिकल्स हे दुकान होते. व्यवसायाची घडी विस्कटलेली होती. कुटुंब संघ परिवाराशी संबंधित होते. पण ते कधी सक्रिय राजकारणात नव्हते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यावर ते सक्रिय झाले. वाजपेयींच्या कार्यकाळात राष्ट्रीय विधि आयोगाच्या उपाध्यक्षपदी दिवंगत आप्पासाहेब घटाटे यांची नियुक्ती झाली होती. घटाटे हे अमोल यांच्या वडिलांचे स्नेही होते. वाजपेयी सरकारच्या काळातच किशोर काळे यांना वीजक्षेत्रातील अनेक कंत्राटे मिळाली. यातून तोट्यातील व्यवसाय सावरला गेला. पुढे अमोल स्वत: विद्युत अभियंता असल्याने त्यांनी याच व्यवसायात पाऊल ठेवलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. रविवारी T-20 सामना पाहिला. त्यानंतर त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली.
अमोल काळे नागपूरकर असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची खास मैत्री होती. २०१४ मध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच अमोल काळेंकडे फडणवीसांचे विश्वासू सहकारी म्हणून पाहिलं जात होतं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष होते. अमोल काळे यांची प्राणज्योत वयाच्या ४७ व्या वर्षी मालवली.