अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला पोलिस दलातील खदान पोलिस स्टेशन निरीक्षक धनंजय सायरेने नागपुरात येवून एका युवतीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या घटनेला एक महिना होत नाही. तोच भंडारा जिल्हा पोलिस दलातील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अशोक बागुल वर युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आजही अभिमानाने घेतल्या जातात. अशा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र पोलिस दलाच्या प्रतिमेला कलंक लावणारे अधिका-यांमुळे कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर खाकीच्या “माना शरमेने” झुकल्या असून पोलिस खात्याच्या “अब्रूची लक्तरे” वेशीवर टांगल्या जात आहेत.
लाखनी तालुक्यातील एका तरुणी नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूणासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या आणि गुपचूप लग्नही केले. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकरांकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तरुणीला त्याच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली. त्यावेळी त्याने तिला नकार दिला.त्यानंतर मनाने खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला,मात्र नशीब म्हणून त्यातून ती बचावली. त्यानंतर तिने प्रियकराविरूध्द तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
सदरहू तरुणी तिच्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता, बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटेच येण्यास सांगितले. तीला पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश न समजल्याने पुन्हा तक्रार देण्यासाठी यांच्याकडे एकटीच गेली. त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली.
हे ऐकून हादरलेल्या तरुणीने या अधिकाऱ्याच्या अशा वागण्याबद्दल थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून तक्रार केली. जे काही घडले ते ऐकून जिल्हा पोलिस अधीक्षक सुद्धा हादरले. तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुल यांच्या विरोधात ३५४ अ,५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्याच्या विरोधात नागपूरात देखील अश्याच प्रकारची तक्रार दाखल झाली होती,अशी चर्चा शहरात ठिकठिकाणी होत आहे.