गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : देशातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश पुर्व परिक्षांचे पेपर लिक होण्याचे प्रमाण सतत वाढत चालले असून, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट यूजी २०२४’ चा निकाल ४ जूनला जाहीर करण्यात आल्यानंतर अनपेक्षितरीत्या वाढलेले ‘कटऑफ’ पाहून, २४ तासात 3 विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मे महिन्यात बिहारमध्ये नीट परिक्षा पेपर लिक प्रकरण उघडकीस आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून असा प्रकार झाला नसल्याचे सुतोवाच केले. बिहार पोलिसांनी नीट परिक्षेचा मागीतलेला ओरीजनल (मुळ प्रत) पेपर अद्यापही ‘एनटीए’कडून देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात असताना, हा नवीन घोटाळा समोर आला आहे. यंदाचा नीट परिक्षेचा ‘कटऑफ’ हा 164 असून मागील अनेक वर्षांपासून असलेल्या ‘कटऑफ’ पेक्षा फार जास्त आहे. तर या वाढलेल्या ‘कटऑफ’ चा धसका घेऊन 24 तासात 3 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले आहे.
नीट परिक्षेचा वाढलेल्या कटऑफ संबंधाने गैरप्रकार उघडपणे केल्या गेल्याची बाब नीट यूजी २०२४ चा ऑल इंडिया रॅंक- 1 मिळविणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचे परिक्षा हॉलमधिल रोल नंबर वरुन स्पष्ट होते. या 13 विद्यार्थ्यांची आसान व्यवस्था आजुबाजुलाच होती. ही बाब हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली, आणि कर्नाटक राज्यातील टॉपर्सच्या संबंधाने समोर आली असून उत्तर प्रदेश, तमिळनाडू व गुजरातमध्ये रॅंक -1 मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचेही रोल नंबर अत्यंत जवळच होते.
एकाच केंद्रातील विद्यार्थ्यांना मिळालेले समान गुण, समान पर्सेंटाईल, ग्रेस मार्क्स याबाबत संशय व्यक्त होत असून 24 तासात 3 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले आहे. ही घटना गंभीर आहे.पण सरकार गंभीर नसल्याने या सर्व प्रकरणात कोठे तरी पाणी मुरते आहे.असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे ‘नीट’चा निकाल १४ जूनरोजी जाहीर होणार होता. परंतु अचानक ‘एनटीए’ने (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर केला. तेव्हा उमेदवारांसह बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. या परीक्षेत सामील होणारे बरेच विद्यार्थी या निकालाला घोटाळा म्हणत आहेत.
काही विद्यार्थ्यांना ७१८ व ७१९ गुण मिळालेले आहेत.पण मार्किंग सिस्टीमनुसार एवढे गुण मिळणे, तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. गुणांच्या अशा वाढीमुळे स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल भीती निर्माण झाली आहे. गुणांच्या ‘नॉर्मलायझेशन’ प्रक्रियेबाबत ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सदर माहिती आधीच का प्रसिद्ध केली नाही? याचा खुलासा होणे काळाची गरज आहे.
हरियाणा येथील एकाच परीक्षा केंद्रातील सहा-सात विद्यार्थ्यांनी समान गुण आणि टक्केवारी मिळविली आणि त्यांची रोल संख्या त्याच मालिकेत दिसून आली. या असामान्य पॅटर्नमुळे यंदाच्या परीक्षा प्रक्रियेतील नियम उल्लंघनाबद्दल अनुमान काढला जात आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आडनाव देखील या मेरीट लिस्टमध्ये नमूद नाहीत. या परीक्षेत जवळपास ६७ विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे जनरल कटऑफमधील विद्यार्थ्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत प्रवेश मिळविणे देखील कठीण झाले आहे. यासोबतच मागासवर्गीय विद्यार्थ्यांचेही भविष्य अंधारात आहे. गुणांमध्ये वाढ झाल्याने कटऑफमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ३०-४० मार्क्सची लक्षणीय वाढ झालेली आहे. ६५० हून अधिक गुण पडलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
या अनियमिततेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई तसेच फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली जात असून, अलिकडच्या काळात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पेपरफुटीचे प्रकार उघडकीस आले असून, या संदर्भात कोणालाही अटकाव केला गेला नाही. देशात एकीकडे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.तर दुसरीकडे पेपरफुटी व या नवीन ‘कटऑफ’ घोटाळ्याने विद्यार्थ्यांमध्ये भविष्याचा विचार करून अस्वस्थता पसरली आहे. पालक चिंतेत असून आता पुढे काय होणार हा प्रश्न भेडसावू लागला आहे.
आता ‘कटऑफ’ वाढीचा नवीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरातील विद्यार्थी व पालकांची चिंतेत अधिकची भर पडली आहे. शिक्षणाची नुसती बजबजपुरी माजली आहे. तर राज्यकर्त्यांनी डोळे मिटून भ्रष्टाचारासाठी खुली सुट दिल्याने नवीन पिढीला हतबल होऊन मृत्यूला सामोरे जावे लागत असेल तर,… तर कागदी घोडे नाचवत विश्व गुरू होण्याची बात ही शुद्ध धुळफेक आहे.
्