अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतासारख्या प्राचीन देशासाठी प्रति पालकत्व ही संकल्पना नवी संकल्पना नव्हे. अगदी भगवान श्रीकृष्ण, सीता, कर्ण, शकुंतला पासून याची सुरुवात झाली आहे. एकीने जन्म देणाऱ्या भगवान श्री कृष्णाचा सांभाळ दुसरीने योग्य प्रकारे करून त्यांच्यावर सुसंस्काराचे रोपण केले. अशा बाबीलाच प्रतिपालकत्व म्हटल्या जाते. समाजात अनाथ बालकांना कुटुंब मिळून देण्यासाठी प्रतिपालकत्व ही संकल्पना समाजात जोमाने रुजवल्या गेल्या पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन स्वनाथ फाउंडेशन मुंबईतच्या अध्यक्ष,ज्येष्ठ समाजसेवी श्रेया भारतीय यांनी केले.
जागतिक फॉस्टर डे’ अर्थात प्रतिपालकत्व दिना निमित्त शुक्रवारी स्थानीय खंडेलवाल भवनात प्रतिपालकत्व जनजागृती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.स्वनाथ फाउंडेशन, मुंबईच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची अध्यक्षता फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रेया भारतीय यांनी केली. सोहळ्याचे उदघाटक म्हणून आ बसंत खंडेलवाल होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य संजय सेंगर, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष एड अनिता गुरव, डॉ अमोल रावणकर उपस्थित होते. दीप प्रजवलन व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.
श्रेया भारतीय पुढे म्हणाल्या, प्रत्येक बालकाला कुटुंब मिळावे ही संकल्पना फाउंडेशनची असून त्या दृष्टीने फाउंडेशन अनेक वर्षापासून समाजातील अनाथ,निराधार, छत्र हरविलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी सेवारत आहे. हा जिल्हा या योजनेसाठी रोल मॉडेल असल्याचे त्यांनी सांगून या दिनावर आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात. आपल्या मनोगतात संजय सेंगर यांनी प्रतिपालकत्वाची परिभाषा प्रतिपादित केली. प्रतिपालकत्व हा शब्द शासकीय स्वरूपाचा आहे. बालकांना आई-वडिलांसारखे प्रेम मिळावे, त्यांना वासल्य लावावे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी राज्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेने अकोला जिल्ह्यात जास्त प्रमाणात स्वीकारल्या गेली असून राज्यात प्रथमच चाइल्ड लाईन पोलीस स्टेशन हे अकोल्यात झाले असून प्रतिपालकत्व संकल्पनेची ही मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या मनोगतात आ. बसंत खंडेलवाल यांनी स्वनाथ फाउंडेशनच्या लोकोपयोगी व बालपयोगी उपक्रमाची प्रशंसा करीत संस्थेस आपल्या शुभेच्छा प्रदान केल्यात. या कार्यक्रमात एड.अनिता गुरव यांनी अनाथ बालकांचे बालपण आनंदी जावे यासाठी ही संकल्पना समाजात दृढ झाली असल्याची माहिती दिली.सर्वप्रथम मान्यवरांचे स्वनाथचे समनव्यक राहुल लोणकर,डॉ पल्लवी रावणकर, स्नेहल मुळे, अश्विनी कुलकर्णी आदींनी स्वागत केले.
प्रास्ताविक डॉ कृतिका वरणकार यांनी करून स्वनाथ फाउंडेशनचे सेवाकार्य व प्रतिपालकत्व या विषयाची संगोपांग माहिती दिली. एक ते सहा वर्षापर्यंतचे मूल हे दत्तक दिल्या जाते व सहा वर्षानंतरचे मूल हे प्रतिपालकत्व म्हणून संगोपनासाठी दिल्या जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन डॉ कामे मॅडम यांनी तर आभार बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्ष व हा उपक्रम साकार करणाऱ्या पल्लवी कुलकर्णी यांनी मानलेत. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी तारा हातवळणे, संदीप काळे, ज्योती पटवर्धन, जेष्ठ संपादक व पत्रकार गजानन सोमाणी, अश्विन लोहिया, गिरीश गोखले,हर्षदा गजभिये समवेत महिला व बाल विकास अधिकारी, बालकल्याण समिती, बालसंरक्षण कक्षाचे अधिकारी,चाईल्ड लाइनचे स्वयंसेवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.