अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील राजकारणात आणि सत्ताकारणात कधीकाळी आपलं वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व राखणारा अकोला जिल्ह्यातील कॉग्रेस पक्ष, आज नावापुरताच शिल्लक राहिला आहे. काही नेत्यांनी आणि त्यांच्या कौटुंबिक वारसांनी कॉग्रेस पक्षाला खाजगी मालमत्ता केली असून, तेच तेच चेहरे बघून आणि तीच तीच नावे वाचून कॉग्रेस विचारांचा पाईक असलेला सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार कॉग्रेस पक्षापासून दूर गेला आहे. हे कटू सत्य असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेकडून असलेली अपेक्षा आता मावळली आहे.
पक्षापासून दूर गेलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद निर्माण करुन पक्ष बळकटची संधी असताना कुठलाही प्रकारचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात अनेक मुद्दे असून याविरोधात एकही मोठे आंदोलन केले गेले नाही. काहींची इच्छा आहे पण पाठबळ दिले जात नाही. अकोला जिल्ह्यातील कॉग्रेस अजगर झाला असून आपल्या गोतावळ्याना घेऊन जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीने पक्षाला फायदा होईलच, यात शंका आहे.
काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी घोषित केली असून, या जम्बो कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस , कोषाध्यक्ष, चिटणीसांसह २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा काँग्रेस (ग्रामीण) विस्तारित कार्यकारिणीला मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.
कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष कोषाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सहचिटणीस, प्रसिद्धी प्रमुख इत्यादी पदांवर २६६ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायम निमंत्रित सदस्यांचाही समावेश आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता, काँग्रेसच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत तब्बल २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश करुन जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आल्याने कागदावर पक्ष मजबूत दिसतोय.