Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडीमोठी बातमी ! वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या : उच्च न्यायालयात याचिका...

मोठी बातमी ! वाशीम लोकसभेच्या मतमोजणीला स्थगिती द्या : उच्च न्यायालयात याचिका : उद्या 31 मे रोजी सुनावणी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रकरण आता थेट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचले आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर केलेली १२२०१८९ मतांची आकडेवारी खरी की यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील २,२२५ बुथवर झालेल्या मतदानाची आकडेवारी खरी, याबाबत पेच निर्माण झाला असून बुथनिहाय मतदानात राळेगाव आणि वाशीम विधानसभा मतदार संघात एकूण २५ मते वाढविण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. यामुळे ही मतमोजणी थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका प्रा. डॉ. अनिल राठोड यांनी दाखल केली आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात वाशीम, यवतमाळ, राळेगाव, कारंजा, दिग्रस, पुसद या एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या बुथनिहाय मतदानाची आकडेवारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या आकडेवारीत कमालीचा फरक आहे. २५ मते ही अधिकची दिसत असून ती कुठून आली, असा प्रश्न उपस्थित करीत हा घोळ आधी दूर करावा व त्यानंतर मतमोजणी घ्यावी. तोपर्यंत चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉ. राठोड यांनी केली आहे.

शुक्रवार ३१ मे रोजी सुनावणी !
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका दाखल करून घेतली असून शुक्रवार, ३१ मे रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. याचिकाकर्ते प्रा.डॉ. अनिल राठोड यांची बाजू जेष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. मोहन गवई यांनी न्यायालयात मांडली असून आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!