Friday, November 22, 2024
HomeUncategorizedऐसा प्यार का...! ६० वर्षांच्या संसारानंतर गौतम दाम्पत्यांनी एकत्रितपणे घेतला जगातून निरोप

ऐसा प्यार का…! ६० वर्षांच्या संसारानंतर गौतम दाम्पत्यांनी एकत्रितपणे घेतला जगातून निरोप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पती व पत्नीमध्ये प्रेम, विश्वास व जिव्हाळ्याचे नाते असते. हे नाते साताजन्माचे असल्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. ६० वर्षांच्या संसारात अतूट प्रेम असलेल्या पती व पत्नीने अवघ्या आठ तासाच्या अंतरात जगाचा निरोप घेतल्याचा अतिशय भावनिक व दुःखद प्रसंग जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडला. वयस्कर दाम्पत्यामधील प्रेमामुळे मृत्यू देखील त्यांची ताटातूट करू शकला नाही. अतूट प्रेमाच्या भावनेमुळेच त्यांनी एकत्रितपणे जगातून निरोप घेतल्याची चर्चा मृत्यूनंतर होत आहे.

जिल्ह्यातील बाळापूर शहरात गुजरातीपूरा भागामध्ये रमेशसिंग करणसिंग गौतम (८२) यांचे राहणे होते. दीर्घ आजारामुळे रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई (७६) यांनी देखील पहाटे अंतिम श्वास घेतला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासातच पत्नीने देखील हे जग सोडले. लग्नानंतर ६० वर्ष वैवाहिक आयुष्याचा प्रवास एकत्र केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट त्यांच्या पाहणीच्या कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी पती २२, तर पत्नी १६ वर्षांच्या होत्या.

पद्माबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील होते. रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे मोठ्या थाटात लग्न लावून दिले होते. लग्नानंतर दोघांचाही संसार आनंदाने फुलला. संसाररुपी वेलीवर दोन मुले आणि दोन मुली अशी फुले उमलली. मुलांचे पालपोषण त्यांचे शिक्षण यामध्ये आयुष्याची अनेक वर्ष निघून गेली. कालांतराने मुल-मुली मोठे झाल्यावर त्यांची लग्न झाली. नातवंडांच्या रूपाने जीवनात आणखी आनंद आला. आयुष्यात सुख समाधान होते. संपूर्ण आयुष्य बाळापूरसारख्या लहान शहरात गेले. ६० वर्षांचा दीर्घकाळ एकमेकांसोबत आनंदी संसारात गेला. वयोमानानुसार आरोग्याची कुरबुरी सुरू झाली. दीर्घ आजापणामुळे पतीचे निधन झाले.

पती रमेशसिंग यांचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी पद्माबाई यांना मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासातच पत्नी पद्माबाई यांनी आपला जीव सोडला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या दु:खद प्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. पती व पत्नीमध्ये खूप प्रेम होते, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. याची बरीच चर्चा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!