अकोला दिव्य न्युज ब्युरो : लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडले असून ४ जून रोजी या निकालाचा निकाल लागणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून प्रख्यात वकील उज्जवल निकम यांच्यात सामना झालेला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. दरम्यान, आता मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबईमधील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मतदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?
मतदान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं की, तुम्हाला (काँग्रेसला) मतदान करून आलो आणि आता फोनही केला आहे. ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लिहिलं जाईल की, ठाकरे कुटुंबाने पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केलं आणि ते वर्षा गायकवाड यांना केलं. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते. तसेच विजयी झाल्यानंतर त्यांची भेटही घेणार,असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मला मतदानानंतर सकाळी वाजताच फोन आला होता. तेव्हा त्यांनी मला विचारलं की काय निकाल लागेल. मी त्यांना सांगितलं की नक्कीच आपला विजय होईल. या सर्व नेत्यांकडून मला खूप शिकायला मिळते”, असं वर्षा गायकवाड या म्हणाल्या. त्या टिव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
प्रशांत किशोर निवडणूक आल्यावर जागे होतात?
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते, ४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. तसेच २०१९ प्रमाणे भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील, असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. यावर बोलताना वर्षा गायकवाड यांनी टीका केली. प्रशांत किशोर हे निवडणूक आल्यावर जागे कसे होतात?, असा टोला त्यांनी लगावला.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, प्रशांत किशोर हे निवडणूक आली की जागे होतात? त्यांचा बोलवता धनी कोण? मी त्यांच्या अनेक मुलाखती पाहिल्या आहेत. ते कोणाचं काम करतात हे सर्वांना माहिती आहे. ते जे ३०७ जागा सांगतात ते कोणत्या आधारावर सांगत आहेत, हा माझा त्यांना प्रश्न आहे. महाराष्ट्रात जवळपास ४० जागा महाविकास आघाडी जिंकू शकते.
एका नेत्याने मला सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये ५० जागा इंडिया आघाडीच्या येतील. दिल्लीमध्येही आमच्या जागा वाढतील. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांच्या रॅली पाहा. लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे यांच्या ३०७ जागा कुठून येणार? मला तर वाटतं भाजपावाले १८० च्या खाली येतील. आता ४०० पारचा नारा संपला आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे जे विधान करत आहेत त्यांच्या विधानाला कोणता आधार असतो? असा हल्लाबोल वर्षा गायकवाड यांनी केला.