अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीचा निकाल २१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ ठरल्या आहेत. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. गतवर्षी मुलींचा निकाल ९४.७० टक्के होता तर यावर्षी ९५.४९ टक्के निकाल लागला आहे. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.४९ टक्के आहे.
जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी १२ हजार ९९१ मुले, ११ हजार ६३४ मुली अशा एकूण २४ हजार ६२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ९४१ मुले व ११ हजार ५७५ मुली अशा एकूण २४ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी ८७ केंद्रांवरून परीक्षा दिली हाेती. एकंदरीतच बारावी परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल घवघवीत लागला आहे. या निकालामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनी अपेक्षेनुसार यंदाही आघाडी मिळविली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा सरस आहे. बारावीच्या परीक्षेत ११ हजार ८४० मुले, तर ११ हजार ५३ मुली असे एकूण २२ हजार ८९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.४० टक्के तर मुलींची टक्केवारी ९५.४९ टक्के आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा दरवर्षीप्रमाणे भरघोस निकाल लागला असून, विज्ञान शाखेचे ९७.६४ टक्के विद्यार्थी पास झाले. त्या खालोखाल वाणिज्य शाखेचा ९३.३३ टक्के, कला शाखेचा निकाल ८७.६८ टक्के, तर व्होकेशनल शाखेचा निकाल ८०.४०२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांचा निकाल उत्कृष्ट लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
असा लागला निकाल
तालुका मुले मुली टक्केवारी
अकोला ४३१९ ४६३७ ९१.०७
अकोट १४२५ १४३० ९१.६८
तेल्हारा ८६१ ८५२ ९५.९६
बार्शीटाकळी १५४२ ११२८ ९५.५६
बाळापूर १२५२ ११६४ ९५.६८
पातूर १४३६ १०१५ ९६.९९
मूर्तिजापूर १००५ ८२७ ९४.५७