अकोला दिव्य न्युज ब्युरो : आज अख्खा देश टीव्ही, मोबाईल, रेडियो, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्यूटरवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना बघण्यात दंग होता. देशभरातील अनेक नेतेही वेगवेगळ्या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटत होते. त्यातही रविवारचा दिवस असल्यानं सारेच ‘रिलॅक्स मूड’मध्ये होते. अशात सामना बघण्यापेक्षाही किंवा रविवारच्या ‘रिलॅक्स मूड’ आनंद घेण्यापेक्षाही केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी एका खास मोहिमेवर होते. रविवारी पूर्णवेळ त्यांनी याच मोहिमेसाठी दिला. शक्यतोवर गडकरी रविवारी नागपूर येथे मुक्कामी राहात स्थानिक पातळीवरील कामांकडं लक्ष देत असतात. परंतु आजचा दिवस तसा नव्हता.
गेल्या आठवडाभरापासून गडकरींना या मोहिमेची चिंता सतावत होती. मोहिम कशी फत्ते करायची यासाठी ते क्षणोक्षणी माहिती घेत होते. संबंधिताना सूचनाही देत होते. अशात न राहावल्यानं गडकरी रविवारी स्वत:च त्या ठिकाणी पोहोचले ज्याबद्दल त्यांना काळजी वाटत होती.
“उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा येथे बोगदा तयार करण्यात येत आहे. दिवाळीच्या दिवशी बोगदा खचल्यानं सुमारे ४१ श्रमिक त्यात अडकले. तेव्हापासून सुमारे आठवडाभराचा कालावधी लोटला तरी या बोगद्यात अडकलेल्या श्रमिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहिम राबविण्यात येतेय. या मोहिमेचं नेतृत्व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे मोहिमेची ‘मिनिट टू मिनिट’ माहिती घेत आहेत.
अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरल्यानंतरही बोगद्यात अडकलेले श्रमिक बाहेर निघत नसल्यानं रविवारी नितीन गडकरी स्वत:च उत्तरकाशी येथे दाखल झालेत. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, रस्ता, वाहतूक आणि राजमार्ग सचिव अनुराग जैन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव रंजन सिन्हा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी बोगद्याजवळ जात घटनेची प्रत्यक्ष माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना अडीच दिवसांची ‘डेडलाईन’ डोळ्यांपुढं ठेवत बचाव मोहिम यशस्वी करण्याची सूचना केली. केंद्र सरकार, उत्तराखंड सरकार आणि बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. भूगर्भ आणि बीआरओ तज्ज्ञांकडुन मोहिमेचं स्वरूप व सद्य:स्थिती देखील जाणुन घेतली.
नितीन गडकरी यांनी सांगितलं की, बचाव मोहिमेदरम्यान श्रमिकांना ऑक्सिजन, खाद्यपदार्थ आणि औषधांचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. बीआरओने काही खास मशिन्स बोलावल्या होत्या. त्या बोगद्याजवळ पोहोचल्या आहेत. हा परिसर हिमालयीन भागात येतो, त्यामुळं भूगर्भाची रचना थोडी जटील आहे. त्यामुळं मोहिम राबविताना कोणतीही चूक होणार नाही, याची प्रचंड काळजी घ्यावी लागतेय. बचाव कार्य सुरळीत सुरू राहिलं तर अडीच दिवसात श्रमिकांना सुरक्षित बाहेर काढता येईल.