अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व मुलासह आपल्याच दोन भाऊ व त्यांच्या दोन मुलांसह चौघांची निर्घृणपणे हत्या केल्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना आज शुक्रवार 17 मे रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी मृत्युदंडाची म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली.अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी ही आरोपींच्या गळ्याला दोरखंडाचा फास लावून मरेपर्यंत लटकवून करण्यात यावी.असे आदेशात नमूद केले आहे.
या प्रकरणातील तिन्ही आरोपी देखील एकाच कुटुंबातील आहेत. मृत्यूदंडाच्या शिक्षेसोबतच आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. दंड भरला नाही तर, आरोपींना ५ वर्षाचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. असे आदेशात नमूद केले आहे. चारही मृतांच्या कायदेशीर वारसांना, त्यांच्यावर अवलंबून असणा-यांना बळी नुकसान भरपाई योजने अंतर्गत आर्थिक वा अन्य सहायासाठी शासनाच्या संबंधीत विभागाकडे सर्व पुर्तताकरून प्रस्ताव पाठविण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची प्रत सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यांना पाठविण्यात यावी, असाही आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी पारीत केला.
अकोट तालुक्यातील मालपुरा येथे 28 जुन 2015 रोजी घडलेल्या या हत्याकांडातील तिन्ही आरोपी अकोट येथील राहुल नगरात राहणारे हरिभाऊ राजाराम तेलगोटे (५५) द्वारका हरिभाऊ तेलगोटे (५०) आणि श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे (२४) असून त्यांच्या विरोधातील खूनाचा गुन्हा सिध्द झाल्याने भादवि कलम ३०२, ५०६ सहकलम ३४ नुसार शिक्षा सुनावली आहे.आरोपींना प्राधान्याने कारावासाची शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रीतरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र रोख दंडाची रक्कम न भरल्यास भोगावयाची वैकल्पीत कारावासाची शिक्षा आरोपींना स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाची आहे.
मालपुरा येथे 28 जुन 2015 रोजी घडलेल्या हत्याकांडातील थोडक्यात हकिकत अशी आहे की, मालपुरा गावाजवळ असलेल्या शेतीबाबत द्वारकाबाई हिने वारसा हक्काप्रमाणे शेतीचा हिस्स्यासाठी दिवाणी न्यायालय तेल्हारा येथे दिवाणी दावा दाखल केला होता. दावा न्यायालयात प्रलंबित असताना घटनेच्या एक महिन्यापूर्वी द्वारकाबाई हिने धनराज आणि बाबूराव यांच्या शेताच्या मध्यभागी 2 एकर जमिनीवर कापूस बियांची लागवड केली होती. त्यावर धनराज व बाबूराव यांनी पुन्हा पेरणी केली.या कारणाने त्यांच्यात वाद सुरू झाले होते. दरम्यान द्वारकाबाई 28 जुन 2015 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास वादग्रस्त शेतात कापसाच्या बियांची लागवड करीत असतांना तिचा धनराज व त्याची मुले शुभम व गौरव यांच्यात वाद झाला. त्यानंतर सर्वजण गावात आले. गावात आल्यानंतर द्वारकाबाईने तिचा मुलगा श्यामला फोन करून मालपुरा येथे बोलाविले. त्यानुसार द्वारकाबाईचा पती हरीभाऊ व त्यांचा मुलगा श्याम आणि दुसरा मुलगा (बाल आरोपी) असे तिघेजण मालपुरा गावात आले. द्वारकाबाईसह चौघांनी संगनमत करून, वाद घालत धनराज सुखदेव चऱ्हाटे, शुभम धनराज चऱ्हाटे, गौरव धनराज चऱ्हाटे व बाबुराव सुखदेव चऱ्हाटे या चौघांना विळा, चाकु, कुऱ्हाड, अशा घातक शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर गळे चिरून व पोट फाडून घटनास्थळीच जीवानिशी ठार मारले.
सदर गुन्ह्याच्या तपासात शेतीच्या हिस्स्यावरुन आरोपीनी चौघांना जिवे मारल्याचे पुराव्यानिशी तपासात निष्पन्न झाले.दरम्यान पोलीस निरीक्षक भास्कर तवर यांनीही तपास केला तर हेमंत चौधरी यांनी उर्वरीत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्रातील आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू होऊन, आरोपींकडून अँड एस.एस.जोशी यांनी तर सरकारतर्फे अँड जी.एल. इंगोले यांनी युक्तिवाद केला. साक्षीदारांची सरतपासणी व उलट तपासणी पूर्ण होऊन, आरोपीला न्यायालयाने दोषी धरल्यानंतर शिक्षेवरील युक्तीवाद करण्यात आला. युक्तीवाद करतांना आरोपींना फाशीच्या शिक्षा द्यावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. शिक्षेबाबत युक्तीवाद ऐकून, निर्णयासाठी बंद केले.आज शुक्रवार 17 रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांनी शिक्षा सुनावली आहे.