अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशासह विदेशातील कलाप्रेमी आणि गणेश भक्तांमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झालेले चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालयचे संस्थापक संचालक प्रदीप उपाख्य गोटू नंद यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावरून जेव्हा प्रदीप नंद….नंद गणपती संग्रहालय.. अशी घोषणा करण्यात आली तेव्हा गणपती बाप्पा मोरया मोरया, जयघोष व टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह दणाणून गेले होते. यावेळी त्यांचा परिचय आणि सन्मानपत्राचे आदरपूर्वक वाचणं करण्यात आले.
दिल्ली येथील त्रिमूर्ती भवन येथे श्रीमती नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्ट व गोल्डन स्पॅरो संस्थेतर्फे देशभरातील 50 नामंकीत व्यक्तींना राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्रिमूर्ती भवन येथील हा सोहळा बघून पदमश्री पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहोत की काय असे जाणवतं होते. देशातील विविध राज्यातील व्यापारी, समाजसेवक, डॉक्टर, वकील, शेतकरी, दुग्ध व्यवसायीक, शिक्षक, कला, संग्रहालय, संगणक, विज्ञान अवकाश संशोधन अशा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या सोहळ्यात सम्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महामंडलेश्वर श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे स्वामी विरेंद्रन महाराज, प्रसिद्ध अभिनेत्री व भरतनाट्यम नर्तिका सुधा चंद्रन उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत आरजे आरती मल्होत्रा यांनी केले.
प्रदीप मधुसूदन नंद यांचा नंद गणपती संग्रहलाय चिखलदरा येथे 3 एकरात असून 7 दालनात 6 हजारांच्यावर गणेश मुर्त्या विराजमान आहेत. त्यात गवताच्या अतिशय बारीक पात्यावरील गणरायाच्या दर्शनासह धान्याचे दाणे, खडू, चांदी, पितळ, तांबे, लोखंड, काच, ग्रॅनाईट, लाकूड, फायबर, मोती, शिंपले, रुद्राक्ष इतकेच नव्हे तर पेन्सिल, साबण, शर्टाची बटन अशा विविध वस्तूंवर अतिशय सूक्ष्म स्वरूपापासून ते सहा फूट उंचीपर्यंत असणाऱ्या गणपतीच्या मुर्ती मेळघाटातील मोथा येथील गणपती संग्रहालयात आहेत.
गणपतीच्या चौसष्ट कला,२१ विद्या यांची सांगड घालून विदर्भ आणि पुण्यातील अष्टविनायक यांची योग्य मांडणी केली आहे.
गणपतीचे अशा पद्धती आणि प्रकारातील संग्रहालय जगात कुठेच नसताना हे संग्रहालय लवकरच जगप्रसिद्ध झाले. या यशासाठी आता पर्यंत नंद यांना जिवन गौरव, विदर्भ रत्न, भूषण महाराष्ट्र, बिझिनेस एक्सलन्सी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व आता दिल्ली तेथील राष्ट्रीय प्रतिभा सन्मान म्हणून सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या हस्ते प्रदीप नंद यांना रियल लाईफ सुपर हिरो व राजमुद्रा असलेला चांदीचा शिक्का देऊन राष्ट्रीय प्रतिभा सन्मान देऊन गौरविण्यात आले. गिरीराज महाराज यांनी प्रदीप नंद यांना प्रमाण पत्र देऊन सन्मानित केले. सोहळ्याचे संचालन डॉ टिळक यांनी केले. सोहळ्याला संसद भवनमधील IAS, IPS अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.