अकोला दिव्य न्युज ब्युरो : एका ८२ वर्षीय वयोवृध्द महिलेवर बळजबरीने कुकर्म करणारा आरोपी शैलेश वाघोडेने दुसऱ्यांदा दाखल केलेला जामीन अर्ज अकोट येथील जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधीश बाविस्कर यांनी फेटाळून लावला आहे.
दहिहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गावातील एका ८२ वर्षीय वयोवृध्द महिलेवर अकोट तालुक्यातील पाटसुल येथे राहणाऱ्या शैलेश अरूण वाघोडेने (३८) बळजबरीने कुकर्म केले असल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून दहिहांडा पोलीसांनी अपराध क्रमांक ३७२/२०२३ भा.द.वि.चे कलम ३७६. ४५२. ३२३, ५०६ अन्वये आरोपी शैलेश अरूण वाघोडेला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तेव्हा पासुन आरोपी शैलेश वाघोडे अकोला कारागृहात बंदीस्त आहे. या प्रकरणात आरोपी वाघोडे विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. तेव्हा जमानत मिळण्यासाठी वाघोडेने जामीन अर्ज दाखल केला होता. जो विद्यमाने कोर्टाने 10 मे 2024 रोजी फेटाळून लावला आहे.
या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जावर लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद केला की, आरोपी शैलेश वाघोडे याने ८२ वर्षीय फिर्यादी महिलेच्या घरामध्ये रात्री ८ वाजताचे दरम्यान जबदरस्तीने प्रवेश करून घराचे दोन्ही दरवाजे आतून लावून घेतले व वयोवृध्द महिलेवर बळजबरीने कुकर्म केले. तसेच सदर बाब कोणाला सांगीतली तर जिवाने मारण्याची धमकी दिली.या प्रकरणात फिर्यादी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय अहवालामध्ये वयोवृध्द लैंगिक अत्याचार झाला असल्याचे निष्कर्ष नमूद आहे. आरोपीला शिक्षा देण्याइतपत दोषारोपपत्रात वैद्यकीय व इतर सबळ पुरावे आहेत. म्हणून आरोपीला जमानत देण्यात येवु नये. आरोपीला कारागृहामध्येच बंदीस्थ ठेवुन हा खटला चालविण्यात यावा अशी मागणी सरकारी वकील अजित देशमुख यांनी दुस-या जमानत अर्जासंबंधाने केली. तसेच युक्तीवाद केला की, फिर्यादी महिला विधवा असून, आरोपी तिच्या शेजारी राहणारा असुन आरोपीने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला आहे.
आरोपी हिन मानसिकतेचा असुन त्याने केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आरोपीला जामीनावर सोडल्यास फिर्यादी व इतर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. जामीनावर सुटल्यास त्याचे मनोधैर्य वाढेल आणि तो अशाच प्रकारचे गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर करुन कारागृहातच बंदीस्त ठेवण्यात यावे असा युक्तीवाद अँड.देशमुख यांनी केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज नामंजुर केला. या प्रकरणाचा तपास दहिहांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरुण मुंढे यांनी करुन दोषारोप पत्रक न्यायालयात दाखल केले.