अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरात घरकुल योजना असून त्यासाठी आवश्यक असलेली जागा देखील लोकांकडे उपलब्ध आहे.परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशाने जिल्ह्यातील गुंठेवारीचे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यानंतर नवीन जिल्हाधिकारी यांनी ते व्यवहार सुरु केले नाही. तेव्हा घरकुलांच्या लाभार्थ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. गरिबांना आपली गुंठेभर जागा खरेदी करता आली नाही किंवा विकता आली नाही. ही समस्या वर्षभरापासून असल्याने याबाबत वारंवार निवेदने, आंदोलने व तक्रारी केल्या होत्या. मात्र उपयोग झाला नाही.म्हणून शिवसेना (उबाठा) शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात आज दुपारी १२ वाजता उप निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्याने अखेर आंदोलक आक्रमक झाले. अखेर जिल्हाधिकारी यांच्या दालनात हा विषय गेल्यावर त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
अकोला मनापा हद्दीतील घरकुल योजनेचे काम प्रभावीत झाल्याने गुंठेवारीचे खरेदी विक्री व्यवहार चालू करण्यात यावेत या मागणीसाठी उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सह. जिल्हा निबंधक अकोला दुय्यम निबंधक अकोला यांना गुंठेवारी क्षेत्राचे खरेदी-विक्री व्यवहार करताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी निर्मित केलेले अकृषिक आदेश, किंवा आदेशाच्या अंतर्गत मंजूर केलेला साक्षाकित नकाशा, प्रति भूखंड पाहुन, नियमाकुल खरेदी-विक्री केल्याबाबतचे व्यवहार बघून नोंद करावी. अकृषक आकारणीही गुंठेवारी आदेश, क्षेत्राबाबत बाबींची पड़ताळणी केल्याशिवाय खरेदी- विक्रीचे व्यवहार होणार नाही. याबाबत आदेशित केले आहे.
जोपर्यंत अकोला महानगरपालिकाद्वारे गुंठेवारी क्षेत्र नियमाकुल करण्यात येत नाही. तोपर्यंत गुंठेवारी पारित केलेले क्षेत्राचे खरेदी विक्री व्यवहार नोंदविण्यास स्थगिती दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रात जुने शहर तसेच हद्दवाढीनंतरचा भाग यामध्ये मोठ्या संख्येने गुंठेवारी प्लॉट आहेत. खरेदी विक्री बंद असल्यामुळे मोठ्या संख्येने गरीब नागरिकांचे भूखंड खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना आर्थिक भुर्दंड तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. मनपाचे आर्थिक नुकसान वाचविण्यासाठी त्वरित गुंठेवारीचे व्यवहार सुरु करावे,अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष राजेश मिश्रा, मंगेश काळे, तरुण बगैरे तसेच माजी नगरसेवक शरद तूरकर,गजानन चव्हाण, मंजुषा शेळके,योगेश गिते आणि नितीन मिश्रा, नितीन ताथोड पाटील, गजानन बोराळे, सीमाताई मोकळकार, योगेश गवळी, सतीश नागदेवे, रवी मडावी, सतीश वानेरे, सुनीता श्रीवास वर्षा पिसोडे, पूजा मालोकारसोबत शेकडो शिवसेनेचे सैनिक उपस्थित होते. आंदोलनामुळे उप निबंधक कार्यालयात सर्वच खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते.
आता चेंडू विभागीय आयुक्ताच्या कोर्टात
आज दुपारी उप निबंधक कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन सुरु असल्याने तिसरे उप निबंधक निलेश शेंडे यांनी आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चेचा प्रयत्न केला. पण आम्हाला निर्णय पाहिजे. या मागणीवर आंदोलक ठाम असल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. तेंव्हा अमरावती विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने आंदोलन तूर्तास स्थगित केले.