गजानन सोमाणी • : एडिटर इन चीफ : आजच्या नवीन पिढीच आयुष्य माहिती व तंत्रज्ञानाच्या अवतीभवती फिरत असून, एकीकडे संपूर्ण जग बोटांच्या टोकावर आले आहे. तर दुसरीकडे पारंपारिक व सामाजिक संकेतांवर आणि मानवी संवाद प्रक्रियेवर या तंत्रज्ञानाने सहजपणे होत चाललेल्या दुर्लक्षाचे विपरीत परिणाम समोर येत आहेत.
आपण सध्या एका सामाजिक परिवर्तनाच्या टप्प्यावर पोहोचलो असून,आता इथून पुढचा रस्ता अस्पष्ट दिसत आहे. हे वास्तव भयानक असून, वेळीच उपचार केला नाही तर, तर….. ? या प्रश्नाचे उत्तर मिस्टर पाठक यांनी केलेल्या कृत्यातून शोधल्या जाण्याचा धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. जर आपण कोणत्या गोष्टीत चांगलं शोधता तर त्यात काही वाईटही असतं आणि चांगल्या ऐवजी वाईट अंगीकारले जाते. अंगवळणी पडते. कारण हा माणसांचा स्वभाव गुणधर्म आहे.हअवघं जग बोटांच्या टोकावर असताना, व्यवहार चातुर्य जगताना पुढचं “भविष्य” अशा गोंडस शब्दात, आज जगण्याचे अविभाज्य भाग असलेल्या “फॉलो -सेव्ह-फारवर्ड आणि डिलीट” या सूत्रांनी नातीगोती जोपासली जात आहेत, यामधून जन्माला घालणारे ‘बाप- माय’ सुध्दा सुटले नाही. हे पटणार नाही पण जळजळीत सत्य आहे.
प्रत्येकाच्या ठायी आज एकच सूत्र आहे की, नामवंतांना फॉलो करा, गरजेचे असेल तर ‘सेव्ह’ ठेवा, ज्ञानवंत दाखवण्यास फॉरवर्ड आणि गरज नाही म्हणून डिलीट करा. ही वृत्ती एवढी वाढली आहे की, आता ‘कबाड’ म्हणून नाती-गोतीच नाही तर आई-वडिलही डिलीट केले जाऊ लागल्याने, मिस्टर गोविंद पाठक म्हणतात, इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यापेक्षा आई-वडिलांना फॉलो करा. गोविंद पाठक अत्यंत सहजपणे बोलून जातात.पण या एका वाक्यात मिस्टर गोविंद पाठक यांच्या उतारवयातील, जीवनातील खिन्नता, हतबलता आणि वेदना देखील सहजपणे अधोरेखित होते. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी तर पडणार नाही ना याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु ती चिंता, काळजी, जाणीव व जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का ? असा प्रश्न या वाक्याने उपस्थित केला आहे
हे कोण्या एका मिस्टर गोविंद पाठक यांच शल्य, दुःख व हताशा नाही तर देशातील लाखो गोविंद पाठक आज असं हताशपणे, चाचपडत आणि उसने अवसान आणून जगत आहेत.कधीकाळी घराच्या वैभवात भर टाकणा-या मौल्यवान शोभेच्या वस्तू, दिवाणखान्याला वेगळाच रुबाब व देखणेपण देणारे महागडे परदे व फर्नीचर काही काळानंतर घरातून डिलीट केले जातात. पण घरातून काढलेल्या मौल्यवान वस्तूंची किमान काही तरी किंमत असते. कोणीतरी विकत घेऊन, ती पुन्हा वापरात घेतात.पण मुलांनी ‘कबाड’ मानून आपल्या जीवनातून डिलीट केलेल्या ज्येष्ठांची किंमतही शून्यच ना ! मोल असते तर वृध्दाश्रमांची संख्या वाढली असती ?
अखेर हा सवाल घेऊन दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी गोविंद पाठकच्या माध्यमातून ज्येष्ठांचा व्यथा, त्यांच्या मनातील खदखद योग्यरीत्या ‘जुनं फर्नीचर’ मध्ये अत्यंत चोख मांडली आहे. गोविंद पाठक आपल्याला अस्वस्थ करतात अन् नकळतपणे आपल्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. आई-वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या नात्याची वीण गुंफता गुंफता त्यांच्या नात्यामध्ये आलेला दुरावा. त्यांच्या नात्यामध्ये पडलेली दरी आणि शेवटी चांगलाच रंगलेला कोर्ट ड्रामा दाखवून मांजरेकरांनी आजच्या तरुण पिढीला योग्य संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स धक्का देणारा असला तरी तरुण पिढीला एक सूचक इशारा देखील क्लायमॅक्समधून दिला गेला आहे.
भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा आणि खोलवर विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे. महेश मांजरेकर आणि त्यांच्या टीमने कौटुंबिक व सामाजिक असा उत्तम चित्रपट दिला आहे.जुनं असले तरी फर्निचरला मोल आहेच, म्हणून मुलं आणि सुने कडून अडगळीत टाकले गेलेले गोविंद पाठक जेव्हा ‘मोल’ वसूल करतात तेव्हा, ते फर्निचर नव्हे तर ख-या अर्थाने मिस्टर गोविंद पाठक वाटतात. सलाम गोविंद पाठक यांना आणि सलाम महेश मांजरेकर यांना देखील !