अकोला दिव्य न्युज ब्युरो : गुन्हेगारांनी पुन्हा एकदा तोंड वर काढले असून उपराजधानीत गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध भडकले आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात दोन हत्याकांड उघडकीस आले आहे. पारडीत गुन्हेगारांच्या टोळीने प्रतिस्पर्धी टोळीवर तलवारीने हल्ला चढवला. एका युवकाचा भरचौकात खून करून पलायने केले. तर दुसऱ्या घटनेत, दारुड्या भावानेच थोरल्या भावाच्या गळा चिरून खून केल्याची घटना तहसीलमध्ये उघडकीस आली.
कुख्यात गुन्हेगार काल्या ऊर्फ नंदकिशोर देविदास कुंभलकर (३७,भवानीनगर, पारडी) आणि रोहित डांगे (२८, गंगाबाग) यांच्या दोघांत वर्चस्वावरून वाद सुरु होता. त्यामुळे रोहितचा काटा काढण्याचा कट काल्याच्या टोळीने रचला होता. गेल्या काही दिवसांपासून रोहितसाठी सापळा रचून खून करण्याचा प्रयत्न काल्या करीत होता. मात्र, रोहित त्यांच्या हाती लागत नव्हता. काल्या साथीदार गौरव संजय कालेश्वरवार (२७), राज मणिराम कुंटलवार (३१, दोघेही रा. प्रेमनगर, झेंडाचौक) आणि शुभम कमलकिशोर भेलेकर (गंगाबाग, पारडी) यांच्यासह रोहितचा शोध घेत होता.चारही आरोपी कारने भवानीनगरातील मानकरवाडी मैदानावर पोहचले.
तेथे रोहितचा भाऊ रोहन देवीलाल डांगे (२४, गंगाबाग) हा दिसला. त्याच्यासोबत राज सुधीर रामटेके आणि आनंद योगींदरनाथ पाठक हे दोघेही तेथे होते. चारही आरोपींनी कारमधून उतरून रोहनला घेरले. त्याच्या पोटाला चाकू लावला आणि ‘तुझा भाऊ रोहित कुठे आहे?, त्याचा आज काटा काढायचा आहे, त्याला येथे बोलाव’ अशी धमकी दिली. मात्र, भावाचा जीव जाण्याच्या भीतीने रोहनने भावाला बोलविण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्याच्यावर भरचौकात हल्ला करून ठार केले. दरम्यान, मित्र आनंद आणि राज हे दोघेही तेथून पळाले आणि थेट रोहितकडे गेले
रोहनवर हल्ला करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे रोहित हा धावतच घटनास्थळावर गेला. मात्र, तोपर्यंत आरोपींनी तेथून पळ काढला होता. या प्रकरणी पारडी पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
दुसऱ्या घटनेत, आईला शिवीगाळ केल्यामुळे चिडलेला मुलगा गौरव गोखे (टिमकी) याने मोठा भाऊ दिलीप गोखे याच्याशी वाद घातला. दिलीपने लहान भाऊ गौरवचा गळा चिरून खून केला. हे हत्याकांड रविवारी रात्री नऊ वाजता तहसीलमध्ये घडले.