Thursday, November 21, 2024
Homeसंपादकियखरेतर काँग्रेसने मोदींचं आभार मानायला हवेत ! आता ‘मोदी की गॅरंटी' चिरनिद्रा...

खरेतर काँग्रेसने मोदींचं आभार मानायला हवेत ! आता ‘मोदी की गॅरंटी’ चिरनिद्रा घेत आहे

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : मागील 10 वर्षांपासून सतत ‘इलेक्शन मोड’ वर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारासाठी विशेष मुद्द्यांची कधीही गरज भासली नाही. प्रचार काळात नेहमीचे 70 वर्षात काय? यासोबतच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधीसह कॉंग्रेस नेते, विशेषतः राहूल गांधी यांच्या एखाद्या वाक्याचा धागा पकडून मोदी आजवर निवडणूकीचा ‘नूर’ पालटून गेले. प्रचलित शब्दांत सांगायचं झालं तर, ‘नॅरेटीव्ह’ सेट करण्यात मोदी एवढे तरबेज झाले आहे की, पुढे काय बोलायचं यासाठी त्यांनी भाजप जाहीरनामातील योजनांची कुठल्याही सभेतून मुद्देसूद मांडणी करून माहिती दिली नाही. मोदींसाठी हे जाहीरनामा आजवर गरजेचे नव्हते.पण निवडणुकीतील सोपस्कार म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. असो ! तर यंदाही हे सोपस्कार पार पाडण्यासाठी भाजपचा जाहीरनामा तयार करून प्रकाशित करण्यात आला आहे.

आता संपूर्णपणे मोदींच्या नेतृत्वातच लढविल्या जात असलेल्या या तिसऱ्या निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत नेमलेल्या समितीने तयार केलेला भाजपचा जाहीरनामा 14 एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आला. जेव्हा, हा जाहीरनामा बघितला तर, हा राजकीय पक्षाचा जाहीरनामा नसून ‘पक्षाचा गाभा’ असलेल्या एका व्यक्तीच्या प्रतिभेला मानवंदना आहे.असं स्पष्ट होते. त्या दस्तावेजाला साजेशे ‘मोदी की गॅरंटी’ असे म्हणत अभिवादन केले गेले.असे असले तरी अचूक अंदाजानुसार, ‘मोदी की गॅरंटी’ प्रकाशित झाल्यानंतर ती काही तासांतच गायब झाली. भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल आज कोणी बोलत नाही, अगदी मोदीही बोलत नाहीत. माफ करा पण, ‘मोदी की गॅरंटी’ आता चिरनिद्रा घेत आहे.हे कटु सत्य आहे.


मोदी, स्वतः ‘मोदी की गॅरंटी’ रद्द करू शकले नाहीत किंवा मसुदा समितीच्या अक्षमतेबद्दल किंवा त्यांच्या कुहेतूंबद्दल चर्चाही करू शकले नाहीत. तर दुसरीकडे प्रचारसभेत कॉंग्रेसचे नेते कॉंग्रेसने प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यातील योजनेची इत्यंभूत माहिती देऊ लागले. आजही जाहीरनाम्यातील योजनांची माहिती देताना दिसत आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा जाहीरनामा भाजप उमेदवार, नेत्यांना अडचणीचे ठरु लागले. पण काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काहीही खोट काढता येत नव्हती. भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करावा तर पटण्यासारखे नाही आणि नाही केला तर ? भाजप नेते या जर-तर मध्ये अडकले असताना, काँग्रेसचा जाहीरनामा कसा टाकाऊ आहे, हे मोदींचं लोकांना पटवून देऊ शकतात आणि कॉंग्रेसचा जाहीरनामा मुसलमान धार्जिणा कसा आहे, हे लोकांना पटवून द्यायचे ठरवले गेले. माझ्या मते, कॉंग्रेस जाहीरनाम्यावरील मोदींचं भाष्य ( मी टीका मानत नाही), मोदी यांचं हे वर्तन भारतीय साहित्याच्या महान परंपरेला धरूनच होते. या परंपरेत मूळ साहित्यकृतीपेक्षा तिच्यावर केलेले भाष्यच अधिक महत्त्वाचे असते ना !

गत दोन आठवड्यातील प्रचारात मोदी सातत्याने सांगत आहेत की, घुसखोरांना (मुसलमान) तुमची संपत्ती कॉंग्रेस वाटून देईल.आणि हे पटवून देण्यासाठी जे नाही.ते सातत्याने सांगत आहेत. उदाहरणार्थ काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोदींनी पुढील रत्नाचं कोंदण केले: काँग्रेस लोकांची जमीन, सोने आणि इतर मौल्यवान वस्तू मुस्लिमांमध्ये वाटून टाकेल.• लोकांकडे किती मालमत्ता आहे याचे, महिलांकडे किती सोने आहे, आदिवासी कुटुंबांकडे किती चांदी आहे याचे काँग्रेस सर्वेक्षण करेल. आणि नंतर ते लोकांकडून हिसकावून घेईल• सरकारी कर्मचाऱ्यांच्या जमिनी आणि रोकड काँग्रेस जप्त करून काँग्रेस त्या इतरांना वाटून टाकेल• डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते की, देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. ते असे म्हणाले होते तेव्हा मी (गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून) तिथे उपस्थित होतो• काँग्रेस तुमचे मंगळसूत्र आणि स्त्रीधन घेईल आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना देऊन टाकेलतुमचे गावात घर असेल आणि तुम्ही शहरात एखादा छोटा फ्लॅट घेतलात, तर काँग्रेस तुमचे एक घर काढून घेऊन दुसऱ्याला देईल• तुमचे गावात घर असेल आणि तुम्ही शहरात एखादा छोटा फ्लॅट घेतलात, तर काँग्रेस तुमचे एक घर काढून घेऊन दुसऱ्याला देईल.असा शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे मौखिक पुनर्लेखन केलं.

दरम्यान मोदींचे विश्वासू सल्लागार अमित शहा यात सहभागी होऊन म्हणाले की, काँग्रेस मंदिराच्या मालमत्ता जप्त करेल आणि ती त्यांना देऊन टाकेल. राजनाथ सिंह यांनीही या मुक्ताफळांमध्ये आपली भर घातली. ते म्हणाले की काँग्रेस लोकांच्या मालमत्ता हडप करेल आणि घुसखोरांना वाटून टाकेल. दुसऱ्या दिवशी, राजनाथ सिंह आणखी एक रत्न घेऊन आले: काँग्रेसने सशस्त्र दलांमध्ये धर्म-आधारित कोटा लागू करण्याची योजना आखली आहे. अशा पद्धतीने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्यांची संख्या वाढत असताना आणि ते या टीका करण्याच्या स्पर्धेमध्ये एकमेकांना मागे टाकत असताना, मोदींना शोध लागला की काँग्रेस ‘वारसा कर’ लागू करण्याचा विचार करत आहे आणि त्यांनी ताबडतोब या कराच्या विरोधात आवाज उठवला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर असा सगळ्या बाजूंनी हल्ला का आणि केव्हा सुरू झाला हे सांगणे फार अवघड नाही. मोदींनी २१ एप्रिल रोजी राजस्थानमधील जालोर आणि बांसवाडा येथे काँग्रेसवर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्ला चढवला आणि तो अजूनही थांबलेला नाही. एकमात्र खरं आहे की, त्यांच्या काल्पनिक लक्ष्यांची यादी विचित्र होती.

या वेडेपणाला आळा घालणे हे खरेतर माध्यमांचे कर्तव्य होते. त्याऐवजी, या वादग्रस्त विषयांवर चर्चा करत बसल्याने मोदींनी सुरू केलेले खोटे युद्ध अनेक पटींनी वाढत गेले. हा दस्तावेज कसा अत्यंत वाईट आहे, असे दाखवू पाहणारे मोदी यांना काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील कोणताही मुद्दा सदोष नसल्याने त्यात काहीही खोट काढता येत नव्हती. त्यामुळे मोदींनी कोणा काल्पनिक भुताने लिहिलेल्या जाहीरनाम्याची कल्पना करून तो कसा टाकाऊ आहे, हे लोकांना पटवून द्यायचे ठरवले.पण देशातील मतदारांना आता मोदींवर संपूर्ण भरवशा नसल्याने जवळपास सर्वचजण कॉंग्रेसचा जाहीरनामा मिळवून घेत, वाचत आहेत. ही अतिशयोक्ती नाही.मोदींच्या समर्थकांना देखील पटणार नाही.पण ही वस्तुस्थिती आहे. अकोल्यातील शेकडो लोकांनी या कपोलकल्पित कथा व वक्तव्याची खातरजमा केली. विशेषतः नवीन पिढी कॉंग्रेस जाहीरनाम्यातील योजनांची माहिती करून घेत आहेत.हे एका दृष्टीने समाजाच्या हिताचे असून, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तिसऱ्यांदा विजयी झाला तर येणा-याकाळात पंतप्रधान कोणत्या प्रकारची विकृती, खोटेपणा आणि गैरवर्तन करेल हे जनतेला आत्ताच दाखवून दिल्याबद्दल, खरेतर काँग्रेसने पंतप्रधानांचे आभार मानायला हवेत. तुर्तास एवढेच.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!