अकोला दिव्य न्युज ब्युरो : संपूर्ण महाराष्ट्रात विशेष ख्याती प्राप्त अकोला येथील श्रीराम नवमी शोभायात्रा स्व.आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने व सर्वसमावेशक सहिष्णूतामुळे ‘सामाजिक एकात्मिकता’चे प्रतिक झाली आहे. आज लालाजींची तीच परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांचीच असून, सामाजिक एकोपा जोपासत यंदाही त्याचं हर्षोल्लासात येत्या बुधवार 17 एप्रिलला भव्य दिव्य स्वरूपात श्री राम नवमी शोभायात्रा काढण्यात येणार आहे, असे श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा यांनी सांगितले.
श्रीराम नवमी शोभायात्रा समितीकडून आयोजित वार्ताहर बैठकीत कृष्णा शर्मा यांनी यंदाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली.ते पुढे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने 38 वर्षांपूर्वी श्रीराम नवमी शोभायात्रा काढण्याला सुरुवात करण्यात आली.दरम्यान आमदार गोवर्धन शर्मा यांच्याकडे सुत्रे सोपविण्यात आली आणि त्यांच्या सर्वसमावेशक सहिष्णूतामुळे अकोला नगरीतील शोभायात्रा अकोल्यातील प्रमुख महोत्सव आणि विदर्भातील विशेष शोभायात्रा म्हणून नावारूपाला आली.
500 वर्षानंतर अयोध्येत श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली असून तमाम हिंदू बांधवांमध्ये एक वेगळीच ऊर्जा व वेगळा उत्साह निर्माण झाल्याने यंदाच्या शोभायात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून दरवर्षी प्रमाणे विश्व हिन्दू परिषदेच्या मार्गदर्शनात श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सिटी कोतवाली चौकात 25 फुट उंचीचा भव्य असा ‘महापराक्रमी हनुमान’ हा चलचित्र देखावा (झाकी) उभारण्यात येणार आहे. या देखाव्याचे आयोजक गुजरात अंबुजा एक्सपोर्ट आहेत. यासोबतच कपडा बाजार चौकात गणपतीचं वाहन मुशक परिक्रमा करीत असल्याचा देखावा साकार करण्यात येणार आहे. श्रीराम नवमी शोभायात्रेमध्यें धर्मध्वजासह 11 घोडेस्वार यामध्ये बालशिवाजी, जिजामाता, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई आणि इतर घोड्यांवर झाकी राहील. श्रीराम पादूकांसह 60 धार्मिक झाकी राहणार आहे. महिलांची 50 आणि पुरुष वारकरी सांप्रदायाच्या 10 दिंडी, ढोलपथकांचा समावेश आहे.
अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरामुळे यंदा शोभायात्रेत जनसागर उसळणार आहे. शोभायात्रेत रामभक्त, मातृशक्तीने लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत कोणताही मोबदला न घेता अत्यंत चोख सेवा देण्यासाठी गाडगेबाबा साऊंड सिस्टीमचे संचालक राजू गाडगे आणि शोभायात्रासाठी मनोहारी दृष्यांची विशेष झांकी करुन देणारे बाबू बागडे यांचा समितीचे माजी अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा व ब्रिजमोहन चितलांगे यांच्या हस्ते समितीकडून स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वार्ताहर बैठकीला सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, समितीचे अध्यक्ष शैलेश खरोटे व कोषाध्यक्ष राहूल राठी तसेच विहिप महानगर अध्यक्ष प्रकाश लोढीया, बजरंग दल प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, गणेश काळकर यांनी संबोधित केले. यावेळी ब्रिजमोहन चितलांगे, रामप्रकाश मिश्रा,अनुप शर्मा, प्रकाश घोगलीया, संजय रोहणकर नवीन गुप्ता, संदिप वाणी, बाळकृष्ण बिडवई, हरिओम पांडे, संजय दुबे, संदिप निकम, उपस्थित होते.