चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोदी यांची काल (सोमवार) चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी जनतेला संबोधतांना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार यांनी असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थितांचे विशेषतः महिलांचे डोके शरमेने झुकले. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसविरोधात वापरलेल्या भाषेबाबत आता जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मोरव्याच्या पटांगणात पंतप्रधान मोदींची भव्य निवडणूक सभा आयोजित करण्यात आली होती.
या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीपूर्वी मुनगंटीवार यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणादरम्यान मुनगंटीवार यांनी बहीण-भावाचा नात्याबाबत असभ्य भाषा वापरली. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींना गळफास लावणारा आणि एकाच बेडवर भाऊ-बहिणींना विवस्त्र झोपवणारा पक्ष असे वर्णन केले. मुनगंटीवार यांच्या तोंडून असा शब्दप्रयोग ऐकून उपस्थित श्रोते अवाक् झाले.
मुनगंटीवार यांच्या या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही क्लिप लोकांपर्यंत पोहोचल्याने आता जिल्ह्यातून या भाषणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्व स्तरातून टीका आणि निषेध केला जात आहे. शांत संयमी अशी मुनगंटीवार यांची ओळख. मात्रं प्रचार सभेत त्यांच्या तोल ढासळत असल्याचे दिसतंय. पराभवाची भीती मुनगंटीवार यांच्यावर हावी झालीय काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने मुनगंटीवार यांचा विजय काही अंशी सुकर केला होता. मात्र, उत्साहाच्या भरात मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्याने त्यावर पाणी फेरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुनगंटीवारांच्या या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. “जी काही भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली आहे. ती भाषा समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी आहे. भाऊ – बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे, हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का? त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हेच जर भाजपचे संस्कार असतील तर या देशाचे काही…”, असं कॅप्शन देत आव्हाडांनी हा व्हिडिओ शेअर केला.