अकोला दिव्य न्युज ब्युरो : नागपूर शहरातील मानकापूर चौकात रविवारी रात्री बेदरकार कंटेनरने सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनाहून अधिक कार-दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होतील की अनेक कारचा चेंदामेंदा झाला. एक कार तर थेट दुसऱ्या कारवरच चढली. या अपघातात १५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
एमएच ३४ एबी ७८८१ या कंटेनरमुळे हा भीषण अपघात झाला. मानकापूर उड्डाणपुलावरून संबंधित कंटेनर वेगाने आला. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि समोर लाल सिग्नल असल्याने थांबलेल्या वाहनांवर कंटेनर मागून धडकला. सर्वांसाठीच हा अपघात अनपेक्षित होता. अगोदर कंटेनरने एका कारला धडक दिली. त्यानंतर अक्षरश: काही कार व दुचाकी फरफटत गेल्या. एक कार दुसऱ्या कारवर चढली तर एक दुचाकी कंटेनरखाली चिरडल्या गेली. या अपघातात एका १०८ रुग्णवाहिकेलादेखील फटका बसला.या रुग्णवाहिकेचाही चेंदामेंदा झाला.
या अपघातानंतर घटनास्थळावर किंकाळ्यांचाच आवाज होता. या अपघातात १८ हून अधिक जण जखमी झाले. घटनास्थळाजवळच दोन ते तीन इस्पितळे असल्याने अनेकांनी तिकडेच लगेच धाव घेतली. काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. मानकापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने अपघातस्थळी पोहोचले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, कंटेनरचे ब्रेक फेल झाले होते का याचा तपास सुरू होता.
अनेक जण फ्रॅक्चर, वाहतुकीचा खोळंबा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मध्यरात्रीपर्यंत तरी कुणाचा मृत्यू झाला नव्हता. मात्र काही जणांना जोरदार मार लागला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकासह काही जण फ्रॅक्चरदेखील झाले आहेत. या अपघातानंतर संपूर्ण मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बघ्यांची गर्दी जमली होती. त्यांना आवरता आवरता पोलिसांच्या नाकी नऊ येत होते.
कारचे दरवाजे ओढून बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार कारचे दरवाजेच या अपघातानंतर उघडत नव्हते. त्यांना घटनास्थळावरील नागरिकांनी कारचे दरवाजे ओढून बाहेर काढले. जबर जखमी असलेल्यांना लोक इस्पितळात घेऊन गेले. तर अनेक जण स्वत:च उपचारांसाठी दवाखान्यात गेले. ज्या कार्सचे नुकसान झाले, त्यातील बहुतांश कार नव्याच असल्याचे दिसून आले.