शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या शिवसेनेने शाखा ते थेट मंत्रालय असा प्रवास करताना अनेक शिवसैनिक जोडले. नोकरीपासून ते मराठी बाण्यापर्यंत विविध हेतूंसाठी लढताना शिवसैनिक तरुणांना राजकारण समजू लागले आणि एके दिवशी एक साधा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. असं असलं तरी साधारण २०१९ पर्यंत शिवसेनेचा जन्म ज्या घरातून झाला त्या ठाकरेंच्या कुटुंबातील कुणीच विधानसभेत पोहोचलं नव्हतं.
२०१९ मध्ये मात्र शिवसेनेने भाजपाची कास सोडून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची हातमिळवणी केली. महाविकास आघाडीच्या तीन चाकी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचे स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती आले आणि ठाकरेंच्या कुटुंबातील पहिला सदस्य थेट विधानसभेत पोहोचला आणि राज्याची धुरा त्याच्या खांद्यावर आली. अनेक गोष्टी मनाप्रमाणे होईपर्यंतच अचानक राज्यात करोनाचा शिरकाव झाला आणि मग पुन्हा चित्र पालटलं, एकीकडे करोना आणि त्यापाठोपाठ ४० आमदारांचं बंड या सगळ्यात ठाकरेंच्या हातून मुख्यमंत्रीपद, शिवसेना नाव, धनुष्य बाण चिन्ह सगळं काही निसटून गेलं. मात्र ज्योतिषतज्ज्ञांच्या माहितीनुसार येत्या महाराष्ट्र दिनीच ठाकरेंच्या नशिबाचे तारे बदलण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंसाठी १ मे २०२४ तारीख महत्त्वाची कारण…उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीच्या षष्ठातील केतू शिवसेना सोडून जाणाऱ्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ठाकरेंना बळ देतो. त्यानुसार, रवी मंगळ त्रिएकादश योगातून उद्धव ठाकरे यांना यंदा राजकीय यश प्राप्त होईल. इतकेच नव्हे तर गोचरीचा षष्ठातील शनी व जोडीने येणारा मंगळ अधिक बलवान होऊन विरोधकांना पराजयाची वाट दाखवेल. तसेच १ मे २०२४ ला नवमात येणारा गुरु निवडणुकीत घडणाऱ्या यशाच्या घटनांचा साक्षीदार असेल. उद्धव ठाकरे विरोधकांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देतील. जे गेले त्यांना जाऊदे व जे राहिले ते शेवटपर्यंत आपले अशा सहृदयतेने उद्धव ठाकरे यांना आपल्या संघटनेचे बळ वाढवणे आवश्यक ठरेल.
उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीत लग्नेश व दशमात बुध वायू राशीचा असल्यामुळे राजकारण हा बुध बौद्धीक बळ वाढवेल. चतुर्थात धनु राशीतील शनि- गुरु दशम स्थानाकडे सातव्या दृष्टीने पाहत आहे. संधी मिळताच विरोधकांना कसे हरवायचे याचे कसब त्यांच्या गाठीशी असेल.