अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतांचं विभाजन टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका तपासून पाहणे गरजेचे आहे.अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सर्वकाही होऊ शकतं. अँड आंबेडकर यांना पाहिजे असलेल्या दोन -चार जागा देण्यास मी सक्षम आहे. यासाठी मला दिल्लीला बोलण्याची गरज नाही. भाजपला कुठल्याही प्रकारे मदत होणार नाही, अशी अँड आंबेडकर यांनी भुमिका घ्यावी, अशी साद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यातील सभेतून दिली आहे. आता चेंडू आंबेडकर यांच्या कोर्टात टाकला असून, ते काय भुमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेले डॉ. अभय पाटील यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित सभेत नाना पटोले यांनी हे आव्हान केले आहे. महाराष्ट्र ही शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांची भुमी असून, डॉ. आ़ंबेडकर यांनी निर्मिती केलेले संविधान बदलण्याचा भाजपने रचलेला डाव मोडून काढण्यासाठी मतांचं विभाजन टाळणे आवश्यक आहे. हीच आपली भूमिका असल्याने अँड आंबेडकर यांना सोबत घेवून लोकसभेची ही निवडणूक लढविली जावी. यासाठी कशोशीने प्रयत्न सुरू असल्याचे पटोले यांनी सांगितले.
मी देखील वंचित असून, शेक-याचा मुलगा आहे.शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांचा प्रश्नांवर पंतप्रधान मोदी यांचा समोर खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आज सर्वसामान्य जनता चोहोबाजूंनी होरपळून निघत आहे. त्यामुळे भाजपची सत्ता चालविण्यासाठी व मतविभागणी होऊन भाजपला होणारा फायदा टाळणे आवश्यक असल्याने या दरम्यान अनेकदा अपमानही सहन केला.असे पटोले यांनी सांगून जागा वाटपातील अनेक बाबींवर प्रकाश टाकला.
आज अकोला लोकसभा मतदारसंघातून आंबेडकर यांना सांगू इच्छितो की, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी मतांचं विभाजन टाळावे. त्यांनी मागितलेल्या दोन-चार जागा मीच तातडीने मान्य करणार. असे पटोले यांनी सांगितले. या दरम्यान पटोले यांनी कॉंग्रेसनी जाहीर केलेल्या २५ हमी योजनेची सविस्तर माहिती दिली. कॉंग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदारांना या योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काहीही होऊ शकतं, असं सुचक विधान पटोले यांनी केले आहे.तर राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं, हे अनेकदा सिद्ध झाले आहे.