अकोला दिव्य न्युज ब्युरो : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीतील भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवून तो रद्द करण्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जात पडताळणी समितीने सर्व बाबी तपासून जातीचा दाखला वैध ठरवण्याचा योग्य निर्णय दिला होता. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने त्यात हस्तक्षेप करून आपल्या विशेषाधिकारात दिलेला निर्णय चुकीचा आहे, असे सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले. न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी व न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने नवनीत राणा यांच्या अपिलावर अंतिम सुनावणी २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण करून राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर केला.
काय आहे प्रकरण?
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट आहे आणि तो गैर पद्धतीने मिळवण्यात आला आहे, असे मुंबई हायकोर्टाने ८ जून २०२१ रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले होते. इतकेच नव्हे तर बेकायदा कृत्य केल्याबद्दल हायकोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होण्याची वेळ आली होती. मात्र, त्यांनी काही दिवसांतच सुप्रीम कोर्टात अपिल केले. सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिल्याने राणा यांची खासदारकी कायम राहिली. त्यानंतर साधारण अडीच वर्षांनंतर हा निर्णय आला आहे.