Wednesday, November 27, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यात काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर ! तिरंगी लढत होणार

अकोल्यात काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर ! तिरंगी लढत होणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उतरवले आहे. सोमवारी रात्री पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अकोल्यात पुन्हा एकदा परंपरेनुसार तिरंगी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय मोर्चेबांधणीला जोर आला आहे. अकोला मतदारसंघात भाजपने खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना, तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत आहेत.

आज सोमवारी रात्री काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. अभय पाटील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. दर लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजप विरोधक म्हणून ‘वंचित’ला महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न झाले. वंचितने देखील सकारात्मकता दाखवली होती. मात्र, जागा वाटप व इतर मुद्द्यांवरून एकमत होऊ शकले नाही. अखेर वंचितने पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला. सोबतच वंचितने काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव पक्षाध्यक्षांना पाठवला. कोल्हापूर व नागपूरच्या काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन देखील जाहीर केले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या बाबतीत पोषक भूमिका घेतल्याने अकोल्यातून त्यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू होते. मात्र, काँग्रेसने अकोल्यात त्यांच्या विरोधात आपला उमेदवार देण्याचे निश्चित करून डॉ. अभय पाटील यांना संधी दिली आहे. गेल्या चार निवडणुकीप्रमाणे यावेळेस देखील अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या तिरंगी लढती नेहमीच भाजपच्या पथ्यावर पडल्या आहेत. या निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होते की नवीन बदल घडून येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!