“महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत नसल्याचे दाखवून देत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचितच्या पहिल्या यादीत पूर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता. तर, दुसऱ्या ११ उमेदवारांच्या यादीत वंचितनं मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात, लातूरमधून नरसिंहराव उदगीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर, वंचितच्या लातूर जिल्हाध्यक्षांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर, सोलापुरातून माजी आमदार दिलीप माने यांनीही कॉंग्रेसचा हात हाती घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन यादी जाहीर केल्यामुळे तेही महाविकास आघाडीत सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचितने स्वत:चे उमेदवार दिल्याने आता काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसेल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र, वंचितची यादी जाहीर होताच, वंचितचे लातूर जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर, सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. नाना पटोले यांनी दोघांचेही काँग्रेस पक्षात स्वागत केले. दरम्यान, या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रसेला बळ मिळालं असून लातूर व सोलापुरात पक्षाची ताकद वाढली आहे. दरम्यान, लातूरमध्ये काँग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे मैदानात आहेत, तर सोलापुरातून प्रणिती शिंदेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे, या दोन्ही पक्ष प्रवेशाचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे.