गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : राजकारणात देशभक्ती, नैतिकता, सचोटी, पक्षाची ध्येयधोरणे इत्यादींना अग्रभागी राखूनच भाजप राजकारण करतंय, यासाठी भाजप ‘पार्टी विथ डिफरंट’ असं भाजप नेते व कार्यकर्ते सांगतात. हे पटण्यासारखंही होते. मात्र २०१९ नंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून ज्या पध्दतीने राजकारण केलं जातं आहे. ते बघून भाजप ‘पार्टी विथ डिफरंट’ हे पटण्यासारख नाही तर खरंच ‘पार्टी विथ डिफरंट’ आहेच.असं दस्तुरखुद्द संघ परिवारातील स्वयं सेवक देखील सांगतं आहेत. आता हे मान्य की उपरोधिक आहे, हा तपासाचा मुद्दा आहे. मात्र एक खरे की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आज ‘सत्ता’ हेच एकमेव लक्ष्य असून यासाठी कुठल्याही स्तरावर जाणे त्यांना अनैतिक/असंवैधानिक वाटत नाही.असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही ना!
या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेऊन, ‘अबकी बार 400 पार’ हा नारा बुलंद केला. तेव्हा निश्चितच मोदी, शाह, नड्डा व यांच्या विश्वासातील नेत्यांनी ठोस उपाययोजना केली असणारचं ! या उपाययोजनांचा एक भाग म्हणून ३७० साठी विरोधी पक्षातील, त्यातही खास कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांचा भाजपात प्रवेश करुन घेतला जात आहे. अर्थात यंदा भारतीय जनता पक्षात विजयी होऊ शकणारे नेते नाहीत काय ? जर विजयी होणारे असतील तर इतर पक्षांच्या नेत्यांना तिकीट का ? मोदींचा करिष्मा ओसरला ! असे प्रश्न निर्माण होतात., काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अन्य पक्षांच्या नेत्यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना तिकीटही देण्यात आले आहे. फक्त मतदारांच्या मनात हेच रुजविण्यासाठी की, भाजपच नाही तर इतरही पक्षातील नेत्यांना मोदींवर विश्वास आहे ना ! मात्र या आयात धोरणात ‘ अपने हुये पराये’ होतंय ना !
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये समावेश करून त्यांना अमरावतीतून तिकीट दिले आहे. लुधियानामधून काँग्रेस नेते रवनीत सिंग बिद्व, पटियालामधून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर, कुरुक्षेत्रमधून काँग्रेस नेते नवीन जिंदाल, सिरसामधून काँग्रेस नेते अशोक तंवर, जालंधरमधून आम आदमी पार्टीचे खासदार सुशील कुमार, भर्तृहरी मेहताब यांना कटकमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांत नाराजी आहे. महताब यांनी नुकताच बीजेडीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांना बाजूला करून पक्षाबाहेरील नेत्यांना तिकिटे दिली. आतापर्यंत भाजपने २९१ पैकी १०१ विद्यमान खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक १४ खासदारांना तिकिटे नाकारली आहेत. भाजपने एकापाठोपाठ एक काँग्रेस, आप आणि बीजेडीच्या नेत्यांना तिकीट वाटप केले आहे.मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल आणि मंडीमध्ये अभिनेत्री कंगना राणौत यांना भाजपने तिकीट दिले आहे. स्थानिक दावेदारांमध्ये मात्र त्यामुळे निराशा आहे. भाजपचे नेते आता हा प्रत्यक्षात प्लॅन बी चा भाग असल्याचे सांगत आहेत. जेव्हा आपलेच नेते जिंकू शकत नाहीत तेव्हा इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन तिकीट द्या, असा हा प्लॅन आहे. त्यानुसार भाजपने अनेक राज्यांमध्ये लोकसभेसाठी तिकीट वाटप केले आहे. परंतु हे आयात धोरणाला मतदार कितपत यशस्वी करतात हे निकालच सांगणार आहेत.