गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : लोकसभा निवडणुकीत भाजप आणि भाजपामहायुती विरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नाला मोठा झटका बसला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटिल यांनी लोकसभा निवडणूक संदर्भात वेळोवेळी जाहीर केलेल्या सर्वच भुमिकावर पुर्णपणे U टर्न घेऊन, हात झटकून बाजूला झाल्याने आजतरी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग फसला आहे. आता आंबेडकर कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता धुसर असताना, मराठा आंदोलनांचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटिल यांच्या माध्यमातून अँड प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. यासोबतच ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा देऊन, अँड. आंबेडकर यांनी मराठा आंदोलक आणि ओबीसी समाज यांच्या माध्यमातून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडीची स्थापना करण्यास पुढाकार घेतला होता. वंचित बहुजन आघाडीतर्फे ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर आंबेडकर यांनी बुधवार २७ मार्चला मध्यरात्रीला आंतरवली सराटीला जाऊन भेट घेतली. जवळपास एक तास चर्चा करून, दुसऱ्या दिवशी जरांगे पाटिल सहभागी होण्याची शक्यताही व्यक्त केली. मात्र ३० मार्चला बोलाविलेल्या बैठकीत, सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्याच दिवशी जरांगे पाटिल यांनी स्पष्ट केले. दरम्यान अँड आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर ‘पाठीत खंजीर’ खूपसल्याची पोस्ट टाकून, त्यांनी वेगळी वाट निवडल्याचे जणू सुतोवाच केले. संजय राऊत यांनी देखील प्रतिउत्तर दिले पण आंबेडकर अजूनही मविआत असल्याचे अधोरेखित केले. यासर्व घडामोडी घडत असताना काल शनिवार ३० मार्चला जरांगे पाटिल यांनी लोकसभा निवडणुक संदर्भात चक्क U टर्न घेतला.
लोकसभा निवडणुकीत ‘मराठा’ मतपेढीची ताकत दाखविण्यासाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय जरांगे पाटिल यांनी जाहीर केला होता. परंतु निवडणूक जाहीर झाल्यानंतर जरांगे यांनी उमेदवार देण्याचा निर्णय रद्द करुन अपक्ष उमेदवार उभे करण्याची भुमिका घेतली. या भुमिकेच्या अनुषंगाने आंबेडकर यांनी चाचपणी करीत तिसऱ्या आघाडीचा डाव मांडला होता. मात्र काल झालेल्या चर्चेनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुक अनुषंगाने कुठल्याही प्रकारची भुमिका घेण्यास नकार दिला. मराठा समन्वयक गावोगावी गेले नाहीत. जे गेले त्यांनी चुकीची माहिती आणली. त्यामुळे अपक्ष उमेदवार उभे करणे शक्य नाही. तसे केल्यास उमेदवार निवडून येणार नाहीत, असं स्पष्ट सांगत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राजकीय आखाडयातून माघार घेतली.
लोकसभा निवडणुकीत ‘सगेसोयरे’ शब्दासह ओबीसीतून आरक्षण देण्यास जे उमेदवार अनुकूल असतील त्यांना निवडून द्या आणि जे प्रतिकूल असतील त्यांना पाडा, असे जरांगे यांनी आंतरवली सराटी येथील बैठकीनंतर स्पष्ट केले. अपक्ष उमेदवार दिल्यास ते उमेदवार पडतील आणि आरक्षणाऐवजी राजकारण हाच केंद्रबिंदू ठरेल, असे म्हणत जरांगे यांनी प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ठिकाणची उमेदवारांची रखडलेली नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
गत लोकसभा निवडणुकीत आसौद्दिन ओवीसी यांच्या सोबत तिसरी आघाडी करुन आंबेडकर यांनी निवडणूक लढविली होती. यामुळे काही जागांवर कॉंग्रेसला फटका बसला होता. तर यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आंबेडकर सुरुवातीपासून आघाडीसाठी सकारात्मक होते. अनेक घडामोडी व नाराजी नाट्यानंतरही सध्याही कॉंग्रेससाठी सकारात्मक असल्याचे दिसून येते.मुंबईत झालेल्या जाहीर सभेत स्वतः आंबेडकर व्यासपीठावर होते. शेजारी प्रियांका गांधी होत्या. आंबेडकरांनी आपले विचारही व्यक्त केले आणि आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी त्यांच्या विचारांचा उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची चर्चा नव्हतीच. परंतु मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद आणि जरांगे पाटील यांची नेमकी काय भूमिका आहे, हे काल पर्यंत गुलदस्त्यात होती. दरम्यान नागपूर व कोल्हापूर या दोन जागेवर कॉंग्रेस उमेदवारांना समर्थन देताना, आंबेडकर यांनी ओबीसी महासंघाचे प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला. तेव्हा एकाबाजूला कॉंग्रेसला कुरवाळत आंबेडकर हे जरांगे पाटलांच्या भुमिकेवर लक्ष ठेवून आहेत. हे अनेकांना लक्षात आले. पण जरांगे पाटिल एकदम हात झटकून बाजूला होणार , याचा पाटलांनी कोणालाही मागसुम लागू दिला नसल्याने, अँड आंबेडकर यांच्या प्रयत्नाला जबरदस्त झटका बसला आहे. आता आंबेडकर कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.