गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे निवडणूक रोखे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची देशभर चर्चा होत असताना दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे दिल्लीचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशा घटनांचे पडसाद उमटत असून यासंदर्भात अमेरिकेकडून सूचक भूमिका मांडण्यात आली आहे. भारतातील राजकीय वर्तुळात घडणाऱ्या काही घडामोडींकडे आपलं बारीक लक्ष असल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांना समन्स!दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर अमेरिकेनं व्यक्त केलेल्या भूमिकेसंदर्भात जाब विचारण्यासाठी भारत सरकारनं बुधवारी अमेरिकन दूतावासातील अधिकाऱ्यांना समन्स बजावले. मात्र, त्यानंतरही अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं असून निष्पक्ष, न्याय्य आणि योग्य वेळी घडणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांना अमेरिका नेहमीच प्रोत्साहन देत राहील, असंही नमूद केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे भारत व अमेरिकेतील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताचा आक्षेप काय?
बुधवारी परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मिलर यांच्या विधानावर भारत सरकारचा आक्षेप नोंदवला. “आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये दोन देशांनी एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा व अंतर्गत बाबींचा सन्मान राखायला हवा. जर हे दोन देश लोकशाही राष्ट्र असतील तर ही जबाबदारी आणखीनच वाढते. अन्यथा यातून चुकीची पद्धत रूढ होण्याची शक्यता आहे. भारतातील कायदेशीर प्रक्रिया या स्वतंत्र न्यायव्यवस्थेद्वारे पार पाडल्या जातात. त्यामुळे त्याबाबतीत अशी भूमिका मांडणं अस्वीकारार्ह आहे”, असं रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.
काय म्हटलं होतं अमेरिकेनं?
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेकडून मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी केलेलं विधान चर्चेत आलं होतं. “मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबाबत निष्पक्ष, न्याय्य आणि वेळेवर कायदेशीर प्रक्रिया पार पडावी या भूमिकेचे आम्ही आहोत”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत भारतानं अमेरिकेच्या दिल्लीतील दूतावासातील अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं. मात्र, त्यानंतरही मॅथ्यू मिलर यांनी आपली भूमिका काय म ठेवली आहे.
मॅथ्यू मिलर मात्र भूमिकेवर ठाम!
दरम्यान, रणधीर जयस्वाल यांनी नोंदवलेला आक्षेप आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना बजावलेल्या समन्सनंतरही मॅथ्यू मिलर मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. बर्लिनमध्ये यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर भूमिका मांडली. “भारतात घडणाऱ्या या घडामोडींवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या घटनेचाही समावेश आहे. काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याचीही माहिती आमच्याकडे आहे. आगामी निवडणुकीत प्रभावी प्रचार करता येऊ नये म्हणून पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप काँग्रेसनं केल्याचीही आम्हाला कल्पना आहे. आम्ही भारतात न्याय्य, निष्पक्ष आणि वेळेवर कायदेशीर प्रक्रिया पार पडावी या भूमिकेचे आहोत”, असं मिलर म्हणाले