अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावाची अधिकृत घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव चर्चेत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या निमित्ताने शाहू महाराज छत्रपती यांच्याविषयी आतापर्यंत कधीही न वाचलेली त्यांची माहिती….
शाहू महाराज छत्रपती हे राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचे पाइक आहेत.शाहू महाराज छत्रपती यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी मुंबईत झाला. कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचे ते पुत्र आहेत. त्यांचे पूर्ण नाव शाहू शहाजी छत्रपती असून ते नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तक पुत्र आहेत. ते छत्रपती घराण्याचे वंशज आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाच्या समाजकार्याचा आणि विचारांचा वारसा तत्परतेने जोपासणे आणि त्यांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत.
शिक्षण व विवाह
त्यांचे शिक्षण नागपूर आणि बंगळुरू येथील बिशप कॉटन हायस्कूलमध्ये पूर्ण झाले असून अर्थशास्त्र, इतिहास व इंग्रजी साहित्य या विषयात त्यांनी पदवी घेतली आहे. श्रीमंत शाहू महाराज यांना वाचनाची खूप आवड असल्याने त्यांच्या वाड्यात भव्य पुस्तकांचं ग्रंथालय देखील आहे. शाहू महाराज यांचा विवाह ९मार्च १९७० रोजी मंगसुळी (अथणी) येथील पवार परिवारातील याज्ञसेनीराजे यांच्याशी झाला आहे. त्यांच्या परिवारात युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराज मालोजीराजे छत्रपती असे दोन पुत्र आहे. दोघेही राजकारणात सक्रिय असून युवराज संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेचे माजी खासदार आहेत तर युवराज मालोजीराजे छत्रपती हे कोल्हापूर उत्तर विधानसभेचे माजी आमदार आहेत.शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. स्वातंत्र्यानंतर संस्थान खालसा झाल्यापासून शाहू महाराज यांची करवीर अधिपती अशी ओळख आहे. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले यांच्याकडून दत्तक घेतले. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजले होते. शाहू महाराजांना दत्तक म्हणून घ्यायला करवीरकरांचा विरोध झाला होता आणि त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाल्याचे जुने जाणकार सांगतात. मात्र ते दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर १९८४ ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर विराजमान झाले.
शाहू महाराज छत्रपती हे सार्वजनिक जीवनात फारसे सक्रीय होत नव्हते. त्याचे कारण म्हणजे दत्तक प्रकरणावरून झालेला वाद. मात्र, १९९५ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराजांसह अनेक राजघराण्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यात घनिष्ठ संबंध होते. यामुळे १९९९ साली शाहू महाराजांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी शाहू महाराजांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यानंतर शाहू महाराज राजकारणापासून देखील अलिप्त राहिले. शाहू महाराज त्यानंतर कोणत्याही राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत.
मात्र त्यांची सर्व राजकीय पक्षांची, संघटनाशी चांगले संबंध आहेत. कोल्हापुरात कोणताही राजकीय नेता आला तर शाहू महाराजांची भेट घेतल्याशिवाय जात नाही. त्याशिवाय कोल्हापुरातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये शाहू महाराजांचे मार्गदर्शन राजकीय नेते घेतात.