अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील एका दानदात्याकडून विद्यार्थी व शैक्षणिक उपयोगासाठी ६५ वर्षांपूर्वी मिळालेली व आज मोक्याच्या ठिकाणी असलेली कोट्यावधी रुपये किंमतीची जमीन विकण्याचा डाव संचालक मंडळाने रचला आहे. विशेष म्हणजे दानदात्याचा मुलगा आणि संस्थेच्या कार्यकारिणी सदस्याला अंधारात ठेवून हा व्यवहार केला जात आहे, असा आरोप वार्ताहर बैठकीत भाजप नेते विजय मालोकार यांनी केला असून, याला कार्यकारिणी सदस्याने दुजोरा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारभाराच्या विरोधात संबंधित सदस्याने अमरावती धर्मादाय आयुक्तांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. होमिओपॅथी महाविद्यालय संचालित करणा-या संस्थेच्या नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड नियमानुसार झाली आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे, असे मालोकार यांनी सांगितले.
अकोला शहरातील अकोट रोडवरील शिवाजी कॉलेज जवळ असलेल्या सर्वात जुन्या व प्रख्यात होमिओपॅथी महाविद्यालयाला ६५ वर्षांपूर्वी प्रभा शिवशंकर जानी यांनी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, रुग्णालय, कर्मचारी आवास आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व इतर कामांसाठी सर्वै नंबर १३ मधून १० एकर जमीन दान केली. मात्र दान म्हणून मिळालेल्या या जमिनीचा गत ६५ वर्षांपासून कुठल्याही प्रकारे संस्थेच्या उद्देशपुर्तीसाठी वापर/उपयोग केला गेला नाही. दरम्यान गोरक्षण रोडवर असलेली ही जमीन आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती झाली आहे. कोट्यावधी रुपयांची स्थावर मालमत्ता विकून मलिदा लाटण्याचा घाट घातला गेला. असे मालोकार यांनी सांगितले.
महाविद्यालय संचालित करणा-या संस्थेकडून २६ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक वर्तमानपत्रात ही जमीन विकण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. अकोला सहधर्मादाय आयुक्तांकडे जमीन विकण्याची परवानगी मागितली काय आणि त्यावर परवानगी देताना संपूर्ण खातरजमा करून घेतली काय? जर परवानगी देण्यात आली असली तरी या विरोधात दानदात्याचा मुलगा आणि संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विजय जानी यांनी आक्षेप घेतला असल्याने परवानगी रद्द करावी, अन्यथा याविरोधात न्यायालयात दाद मागणार, असे मालोकार यांनी वार्ताहर बैठकीत सांगितले.
करोनाकाळापुर्वी २०१९ नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजपर्यंत कार्यकारिणी मंडळाची बैठक झाली नाही. तसेच त्यांना या संदर्भातील बैठकीची कुठल्याही प्रकारे सुचनाही मिळाली नाही. त्यांना अंधारात ठेवून ही जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. या विरोधात त्यांनी अमरावती धर्मादाय आयुक्तांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अन्वये या संस्थेची नोंदणी केलेली आहे. तेव्हा ज्या उद्देशाने जमीन देण्यात आली आहे, त्या उद्देशाची पुर्तता करणे कायद्याने बंधनकारक आहे. असे दानदात्या प्रभा शिवशंकर जानी यांचे पुत्र व संस्थेचे विश्वस्त विजय जानी यांनी यावेळी सांगितले. जानी कुटुंबाकडून एका उदात्त हेतूने ही जमीन दान केली असल्याने या जागेवर महाविद्यालयाची नवीन इमारत व रुग्णालयाची निर्मिती व्हावी, हीच आमची मागणी आहे, असे जानी यांनी यावेळी सांगितले.
्