अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कारला सातारा परिसरात अपघात झाला. साताऱ्यात वाई जवळ हा अपघात घडला. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. रामदास आठवले वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. या दरम्यान एका कंटेनरने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले, परंतु सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले.
रामदास आठवले यांच्या वाहनासमोर कंटेनर जात होता. कंटेनरने अचानक ब्रेक लावल्यावर रामदास आठवलेंच्या कारने कंटेनरला धडक दिली. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले. रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र रामदास आठवले सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.
याआधी जयकुमार गोरे, विनायक मेटे या लोकप्रतिनिंधाचाही अपघात झाला होता. आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताची घटना घडली होती. त्यांची गाडी पलटी झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार झाले व ते बचावले. मात्र शिवसंग्राम संघटेनेचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांचा अपघाता मृत्यू झाला होता. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर त्यांचा अपघात झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता.