अकोला दिव्य न्युज ब्युरो : सुप्रसिद्ध गीतकार, पटकथाकार, शायर ’गुलजार‘ यांना नुकताच साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर झाल्याच्या सन्मानार्थ विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला, डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन, नागपूर आणि प्रभात किड्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जश्न-ए-गुलजार’ अर्थात ‘कलम के जादूगर को संगीतमय सलामी‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुलजारांच्या गीतांची जादूच अशी की, मुरलेल्या गुलकंदासारखी ! अशा बहारदार कार्यक्रमाचा सोहळा वाशिम रोड स्थित प्रभात किड्स स्कूलच्या सभागृहात भरगच्च रसिकांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाची संकल्पना विदर्भ साहित्य संघ, नागपूरच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. गजानन नारे यांची होती.
आनंद पद्मन यांनी ‘परिचय’ चित्रपटातील ‘मुसाफिर हूँ यारो’ गुलजार यांच्या शब्दांनी गुलजार झालेले गीत सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली. आशिष खुरपे यांनी ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ हे गीत सादर केले. ‘वो शाम कुछ अजीब’ हे अमरीश तनेजा यांनी तर ‘लेकीन’ चित्रपटातील ‘यारा सीली सीली’ हे गीत रश्मी देव यांनी नजाकतीने सादर केले. ’आनंद’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘मैने तेरे लिये…’ हे गीत अतुल डोंगरे यांनी तर ‘बरसो रे मेघा मेघा’ हे ‘गुरू’ चित्रपटातील गीत भूमिका राऊत व त्यावर नृत्य श्रृती गोरे व स्वप्नाली बंड यांनी सादर केले.
‘तेरे बीना जिंदगी से कोई’ हे गीत अॅड. वल्लभ नारे यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. सर्व गायकांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करीत रसिकांना सुरेल मेजवानी दिली. ‘मौसम’ चित्रपटातील ‘दिल धुंडता है’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटातील ‘कजरारे-कजरारे‘ या युगल गाण्यांवर प्रज्योत देशमुख, भूमिका राऊत व विजय वाहोकार यांनी रॉकिंग परफॉर्मन्स दिला. ’लकडी की काठी’ हे ‘मासूम’ चित्रपटातील गीत बालकलाकार व गायिका परिणीता बारापात्रे हिने तर ‘उंगली पकडके तुने’ हे भूमिका राऊत यांचे गीत उपस्थित रसिकांना भावविभोर करून गेले. ‘स्लम डॉग मिलेनियर’ या चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार प्राप्त ‘जय हो..’ हे गीत प्रज्योत देशमुख यांनी सुरेल अशा आपल्या आवाजात गायलेल्या मॅशअप् गीतांनी संपूर्ण सभागृह चैतन्याने न्हाऊन गेला.
संपूर्ण कार्यक्रमाचे शायरीपूर्ण व प्रसंगोचित निवेदन मो. आसिफ जारियावाला व झिनल सेठ यांनी केले. या बहारदार कार्यक्रमामध्ये अॅड. वल्लभ नारे, प्रज्योत देशमुख, अॅड. शिवम भौरदकर, आनंद बोराटने, धम्मपाल शेगोकार, नंदकिशोर डंबाळे, अतुल डोंगरे या कलाकारांनी गुलजारांच्या गीताला समर्पक साथ दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाईट व साऊंड सहाय्य सचिन मुरुमकार, जय आसोलकर ग्राफीक्स विजय गजभिये, अनिरुद्ध डेकाटे, पंकज देशमुख, मुद्रीत शोधन प्रा. डॉ. सुहास उगले, छायाचित्रण निखिल वडतकर, दिनेश आगाशे व तांत्रिक सहाय्य श्रीकांत बुलबुले व प्रशांत तळोकार यांनी परिश्रम घेतले.