अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्य आणि देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली भाजपाची उमेदवारांची दुसरी यादी आज प्रसिद्ध झाली असून अकोला लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री व खासदार संजयभाऊ धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचं जागावाटप अडल्याने रखडलेली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीही भाजपानं प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एकूण २० उमेदवारांची धोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. त्यात काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली असून, काही राज्यातील काही बड्या चेहऱ्यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपानं नागरपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तर जालना येथून पक्षाने रावसाहेब दानवे यांना पुन्हा संधी दिली आहे. सांगलीमधून संजयकाका पाटील आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.काही मतदारसंघामध्ये भाजपानं उमेदवार बदलले आहेत.
राज्यातील आघाडीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली आहे. चंद्रपूरमधून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याशिवाय मुंबई उत्तरमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना आणि मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. जळगावमध्येही भाजपानं उमेदवार बदलला असून, तेथे स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अकोला येथून भाजपाकडून अनूप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.