अकोला दिव्य न्युज ब्युरो : मुदतवाढ दिलेली असताना अकोला शहरातील 7 दलालांसह पश्चिम विदर्भातील 53 दलालांनी महारेरा नोंदणीचे नूतनीकरण केले नसल्याने, पर्यायाने प्रशिक्षण प्रमाणपत्र न घेतल्याने या 53 दलालांची नोंदणी महारेराने रद्द केली आहे.या दलालांनी महारेरा नोंदणी शिवाय दलाली व्यवसाय केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
नोंदणीकृत प्रॉपर्टी ब्रोकर आणि दलाल म्हणून काम करू इच्छिणाऱ्यांना महारेरा प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. असे असतानाही हजारो जुन्या दलालांनी नोंदणीचे नूतनीकरणच केले नसल्याचे पर्यायाने प्रशिक्षण प्रमाणपत्र न घेतल्याचे महारेराच्या निदर्शनास आले आहे. अशा १३ हजार ७८५ दलालांची नोंदणी महारेराने रद्द केली आहे. या सर्व दलालांची संकलित यादी महारेराने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. या दलालांना भविष्यात जागेच्या खरेदी – विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर त्यांना विहित प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थावर संपदा क्षेत्रात दलाल म्हणून काम करणाऱ्या जुन्या आणि नव्या दलालांना महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय त्यांना आता काम करता येणार नाही. त्यामुळे २०१७ मधील जुन्या नोंदणीकृत दलालांना प्रशिक्षण परीक्षा देऊन प्रमाणपत्र घेणे आणि त्यानंतर नोंदणीचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. यासाठी मुदतवाढ दिलेली असताना हजारो दलालांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा १३ हजार ७८५ दलालांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द झालेल्या दलालांना आता प्रशिक्षण प्रमाणपत्र घेऊन पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. विनानोंदणी काम करणाऱ्या दलालांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.