गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : सहसा आपल्याला आपल्या पूर्वजांविषयी माहिती असतं, इथे पूर्वज म्हणजे पुरुष हे आपण गृहित धरतो. शेकडो वर्षं फक्त पुरुषांनी केलेल्या गोष्टींनाच समाजाप्रति असणारं भरीव योगदान समजलं गेलं आहे, मग भले मोठ्यातल्या मोठ्या संकटातून घराला तारून नेणारी बाई असली तर नाव लागतं पुरुषाचंच. त्याचप्रमाणे देशाला, समाजाला मोठं करणाऱ्या महिला अनामिक राहातात, अनेकदा त्यांचा साधा नामोल्लेखही कुठे केला जात नाही, ऋणनिर्देश तर लांबचीच गोष्ट. अशाच आपल्या अकोल्यातील एक पूर्वज आहेत दुर्गाताई जोशी आणि त्यांच्या असंख्य सहकारी महिला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढाईत अकोला शहरातील महिलांना सक्रिय सहभागी करुन, महिला हक्क आणि सबलीकरण यासाठी दुर्गाताई जोशी, प्रमिलाताई ओक, सावित्रीबाई बियाणी आणि त्यांच्या असंख्य सहकारी महिलांनी मोठं काम केलं पण आजही फारशी माहिती नाही. देशभरात इंग्रजांच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ वाढू लागला. संघटना/ संस्थांची स्थापना होऊ लागली. प्रत्येकजण आपआपल्यापरीने लढ्याला व समाजाला दिशा देण्याचे काम करीत होते. तेव्हा १९२९ च्या सुमारास अकोला शहरात ‘राष्ट्रीय महिला मंडळ’ ही बेरारमधील पहिली महिला संघटना अस्तित्वात आली. सत्याग्रहींच्या कुटूंबातील महिला या संघटनेसोबत जोडल्या जाऊ लागल्या. वर्ष १९३० मधील ६ ते १३ एप्रिलपर्यंत, हा कालावधी कायदेभंग युद्धासाठी निश्चित केला. आजच्या अकोला जिल्ह्यातील ‘दहिहांडा’ गावात १३ एप्रिल १९३० रोजी सकाळी साडे सहा वाजता सत्याग्रहीवीरांनी तेथील विहिरीतील पाणी उपसून, उकाळून मीठ तयार करून कायदेभंग केला.
त्यानंतर महिलांनी संपूर्ण बेरारमध्ये यासाठी मार्गदर्शन सुरु केले. अकोला येथील टिळक मैदानावर २१ एप्रिल रोजी रणरागिणी दुर्गाताई जोशी यांच्या नेतृत्वात महिलांनी मीठ तयार करुन कायदेभंग केला. ‘नमक का कानून तोड दिया’ अशी गर्जना चारीही दिशेला गर्जून गेली. महिलांनी तयार केलेल्या मिठाची पहिली पुडी ७५ पैशात विकल्या गेली. कायदेभंग आंदोलनात महिलांना एकजुट करणाऱ्या रणरागिणी दुर्गाताई जोशी या खऱ्या अर्थाने बेरारच्या पहिल्या महिला स्वातंत्र्यसेनानी आहेत.
परदेशी वस्तुंचा बहिष्कार, जप्त केलेल्या साहित्याचे वाचन, दारुच्या दुकानावर पीकेटींग सारखे कार्यक्रम सुरु झाले. जवळपास एक वर्षापर्यंत सविनय कायदेभंग करत होत्या. कारागृहात डांबल्या जात होत्या.नाना प्रकारे यातना दिल्या जात होत्या. मात्र सत्याग्रही दुर्गाताई जोशी, राधाबाई ओक, प्रमिलाताई ओक, सावित्रीबाई बियाणी, प्रमिलाताई अग्रवाल, सरस्वतीबाई चौधरी, सुभद्राबाई जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून शेकडो महिलांनी बेरारमधील जंगल सत्याग्रहात सहभागी होऊन शेवट पर्यंत स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत ठेवून होत्या.
बेरारमध्ये इंग्रजांना महिलांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत होते.१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाचे नेतृत्व करून प्रमिलाताईंनी महिला शक्तीची जाणीव करून दिली. राधाबाई ओक, प्रमिलाताई ओक, सावित्रीबाई बियाणी, प्रमिलाताई अग्रवाल, सरस्वतीबाई चौधरी, सुभद्रा बाई जोशी यांच्या सोबत कुसुमताई मेन, चंपूताई परांजपे, गीताबाई पुराडउपाध्ये, रमाबाई केळकर, कमल चांदूरकर, वत्सलाबाई प्रधान, जुबेदाबेन काझी, डॉ.सुमन पारनाईक, कुसूमताई शेंडे, शांतादेवी माहेश्वरी, सूनंदाबाई जकाते, सुमन मुंगी, भागीरथीबाई रोकडे, ज्योत्स्नाबाई कर्णिक, बसंतीबाई झंवर, मालतीबाई मुंगी या सारख्या महिलांचे नेतृत्व पश्चिम विदर्भाला मिळाले. राष्ट्रीय संकटाच्या वेळी नेहमी आर्थिक व साधन सामुग्रीच्या माध्यमातून सहाय्यता करणाऱ्या राष्ट्रीय महिला मंडळाच्या कार्याची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून कौतूक केले. ते पत्र आजही जपून आहे.
तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री सीडी उपाख्य डॉ. चिंतामनराव देशमूख यांनी १२ ऑगस्ट १९५२ रोजी अकोल्याला भेट दिली. तेव्हा ते म्हणाले की, ‘मी बऱ्याच संस्था पाहिल्या पण येथील स्त्रियांची एकी पाहून आनंद झाला. अशा प्रकारचे सहकार्य अनुकरणीय होय. यानंतर डॉ. देशमुख यांनी केंद्रसरकारच्या पंचवार्षिक योजनेत एक योजना सत्त्याग्रही दुर्गाबाई जोशी यांच्या नावाने सुरु करुन, येथील महिला शक्तीचा यथोचित सन्मान केला. (जागतिक महिला दिनानिमित्त)