अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला महापालिकाचे नवीन आयुक्त म्हणून डॉ.सुनील लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास मंत्रालयाकडून बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून, नागपूर येथून आपल्याला रिलीव करण्यात आल्यानंतर अकोला येथील नवीन पदभार स्वीकारु असे लहाने यांनी सांगितले.अकोला महानगर पालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची पुणे येथे अतिरिक्त विभागीय उपायुक्त म्हणून बदली केल्याने, डॉ. लहाने यांची नागपूर येथून अकोला येथे आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ.लहाने कामकाज सांभाळत होते.
अकोला महापालिका आयुक्त म्हणून कविता द्विवेदी यांनी १६ सप्टेंबर २०२१ रोजी पदभार स्वीकारला होता. जवळपास २ वर्ष ५ महिने ७ दिवस एवढ्या कालावधीत त्यांनी आयुक्त म्हणून कामकाज बघितले. अकोला महापालिका मधील बेताल कारभार सुरळीत करण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले.पण कुठल्याही ठोस कारणावीना शहरातील मालमत्ता कर वसुलीचे खाजगी कंत्राट देऊन द्विवेदी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. नवीन आयुक्त डॉ.लहाने यांना देखील अकोला महापालिकांमध्ये शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यासोबतच राजकीय हितसंबध असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या कंत्राटदाराला फुकटात देण्यात येणारे ८ टक्के कमिशनमुळे महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान कसे टाळता येईल, यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.