अकोला दिव्य न्युज ब्युरो : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या ठप्प झालेल्या सेवा आता सुरू झाल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा निःश्वास सोडला. मंगळवारी रात्री ९.१० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार) भारतासह जगभरात मेटाच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. दरम्यान, तब्बल ५० मिनिटांनंतर रात्री १० वाजता मेटाच्या सेवा सुरळीत झाल्या. तासभर फेसबूक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याने युजर्स वैतागले होते. त्यांनी त्यांची नाराजी एक्ससारख्या इतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर व्यक्त केली. सोशल मीडिया नेटवर्कबाबतच्या घडामोडींची माहिती देणाऱ्या डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ ते रात्री १० वाजेपर्यंत मेटासह गूगलच्या सेवांमध्येदेखील अडथळे येत होते.

रोबोज डॉटइन टेकचे सीईओ मिलिंद राज यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, मी स्वतः अनेकवेळा फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. तसेच नेमकी अडचण काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी लॉग इन करू शकलो नाही. मला वाटतंय की, हा एक ग्लोबल सायबर अटॅक होता.रात्री ९ वाजल्यापासून फेसबूकसह इन्स्टाग्राम, मेसेंजर, थ्रेड आणि मेटाचे इतर सर्व प्रकारचे अॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळं बंद होती. दरम्यान, सेवा सुरळीत झाल्यानंतरही मेटाकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. यापूर्वीदेखील जेव्हा-जेव्हा फेसबूकची सेवा ठप्प झाली होती तेव्हादेखील मेटाने कधी सेवा ठप्प होण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. मेटाने यावेळीदेखील फेसबूक डाऊन का झालेलं याबाबतची माहिती दिली नाही.