अकोला दिव्य न्युज ब्युरो : दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने ठेवी व कर्ज वाढीतील टक्केवारीतील अव्वल क्रमांक कायम राखला आहे. सद्य वित्तीय वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत पुणे स्थित बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या ठेवी व कर्ज व्यवहारात 20% पेक्षा जास्त वाढ नोंदवून आपला टक्केवारीतील प्रथम क्रमांक कायम राखला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये समाप्त झालेल्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज व्यवहारात 23.55% वाढ झाली असून बँकेचा एकूण कर्ज व्यवहार रु 1,83,122 कोटी एवढा झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कामगिरी व आकडेवारीत हे नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेने 20.29%, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाने 17.26% व युको बँकेने 16.53% वाढ नोंदवून अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या कर्ज व्यवहारात 13.21% वाढ नोंदवून सातवा क्रमांक पटकावला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या रु 1,75,676 कोटी च्या तुलनेत भारतीय स्टेट बँकेचा एकूण कर्ज व्यवहार 16 पट म्हणजेच रु 28,84,007 कोटी आहे. ठेवींच्या वाढीतील टक्केवारीचा विचार केल्यास सप्टेंबर 2023 अखेर बँक ऑफ महाराष्ट्रने रु 2,39,298 कोटीच्या ठेवी संकलित करून 22.18% वाढ नोंदविली आहे.
प्रकाशित झालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बरोडाने ठेवींमध्ये 12% वाढ नोंदवून (एकूण ठेवी रु 10,74,114 कोटी) दुसरा तर भारतीय स्टेट बँकेने 11.80% वाढ (एकूण ठेवी रु 45,03,340 कोटी) नोंदवून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
कमी व्याजदर असलेल्या चालू व बचत खात्यातील ठेवी (कासा ठेवी) संकलनात देखील बँक ऑफ महाराष्ट्राने 50.71% वाढ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ने 49.93% चालू व बचत खात्यातील ठेवी संकलनात वाढ नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठेवी व कर्ज व्यवहारातील या वाढीमुळे बँक ऑफ महाराष्ट्राचा एकूण व्यवसाय 22.77% वाढून रु 4,22,420 कोटी झाला आहे.
बँक ऑफ बडोदाने 13.91% वाढ (रु 19,08,837 कोटी) नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सद्य आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ठेवी, कर्ज व एकूण व्यवसायात सुमारे 25% वाढ नोंदवून सार्वजनिक बँकिंग क्षेत्रांतील बँकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.अशी माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.