अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात सक्रीय आहे.या टोळीच्या मुसक्या आवळणे आवश्यक असून जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी याप्रकरणी जातीने लक्ष देवून शहरातील या राजकीय गुन्हेगारी , व्हाईट कॉलर टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी होत आहे.
शहरातील राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी वारसदार नसललेली ची कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे बनावट मृत्यूपत्र तयार करून ती हडप करण्याचा नवा फंडा वापरत आहेत. काही वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या बनावट मुख्त्यारपत्राचे नावकार प्रकरणाची पुनरावृत्ती शहरात सुरू झाली आहे. यामध्ये शहरातील काही राजकीय पुढारी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन, समाजातील प्रतिष्ठीतांना अडचणीत आणले आहे. यासोबतचं प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी वृत्तपत्र व प्रसार माध्यमांची दिशाभूल करणारे पत्रक काढून, उच्चभ्रू वस्तीतील महागड्या मालमत्तांवर अनधिकृतपणे ताबा मिळविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश लागण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिस प्रशासनाला दबावात आणण्यासाठी संबंधीत ठाणेदाराची वरिष्ठांपासून तर मंत्रालयांपर्यंत बनावट तक्रारी करण्यापर्यंतची मजल या टोळीने गाठली आहे. ठाणेदारांनी दिलेला सल्ला देखील धमकी दर्शवून त्यांचीही तक्रार करण्यात येत असल्याचे पोलिस अधिकारी देखील हादरले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. संपत्तीचा ताबा घेणे आणि त्याची शहानिशा करण्याचे संपूर्ण अधिकार सक्षम दिवानी न्यायालयात मोडत असताना अशा घटनांना हेतुपुरस्सरपणे गुन्हेगारी प्रकरणात वळवून मानसिक त्रास देऊन खंडणी मागितल्या जात आहे.दिवानी न्यायालयाकडून मृत्यूपत्र खरे की खोटे ? यासाठीचा आदेश न घेता फौजदारी कायद्यांच्या कलमांचा दुरूपयोग करून फसवणूक केली जात आहे. अशा गंभीर प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी आता तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.