अकोला दिव्य न्युज ब्युरो : इंडियन नॅशनल लोकदल (INLD) पक्षाचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. रविवारी झज्जर जिल्ह्यातील बहादूरगड येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार राठी हे आपल्या एसयूव्हीमध्ये प्रवास करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.
अंगरक्षकांवर रुग्णालयात उपचार
INLD चे प्रवक्ते राकेश सिहाग यांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार राठी यांच्या संरक्षणासाठी असलेल्या तीन खासगी अंगरक्षकांनाही गोळ्या लागल्या आहेत. या अंगरक्षकांवर रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. या गोळीबारात राठी यांच्यासह INLD पक्षाच्या आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.या घटनेबाबत झज्जरचे एसपी डॉ. अरपीत जैन यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांच्या सीआयए, एसटीएफच्या टीमकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. आम्ही या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करू, असे जैन यांनी सांगितले.
राठी हे १९९६ आणि २००६ अशा एकूण दोन वेळा बहादूरगडमधून येथून आमदार झाले होते. त्यांच्या या हत्येनंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. या घटनेच्या माध्यमातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती समोर येत आहे. या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, हे सिद्ध होते. राज्यात कोणालाही सुरक्षित वाटत नाही, अशी भावना हुड्डा यांनी व्यक्त केली.
जानेवारीत राठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये हरियाणा पोलिसांनी माजी मंत्री मांगे राम नुंबेरदार यांचा मुलगा तथा स्थानिक भाजपा नेते जगदीश नुंबेरदार यांच्या आत्महत्येप्रकरणी राठी तसेच इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.