अकोला दिव्य न्युज ब्युरो : जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने आज सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापा टाकला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. याशिवाय केंद्रीय एजन्सीने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले आहेत.
सत्यपाल मलिक यांच्या घरावर आणि कार्यालयावर CBI ने छापा टाकल्यानंतर आता मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे” असं म्हटलं आहे. तसेच ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्या घरावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याचं म्हटलं आहे. सत्यपाल मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
मी गेल्या 3-4 दिवसांपासून आजारी आहे आणि रुग्णालयात दाखल आहे. असं असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर छापे टाकले जात आहेत. माझा ड्रायव्हर आणि माझा सहाय्यक यांच्या घरावर देखील छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे” असं सत्यपाल मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की, ते राज्याचे राज्यपाल असताना (त्यावेळी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला नव्हता) प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. गेल्या महिन्यातही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते.