अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र राज्यातील नवजात शिशूंना थॅलेसिमीया, हिमोफिलीया व सिकलसेलच्या आजारापासून संरक्षण तसेच या आजाराच्या रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिव्यांग मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. स्वतंत्र कारभार असलेल्या दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नुकतीच मुंबई येथे दिव्यांग मंत्रालयात अकोला थॅलेसिमीया सोसायटीचे अध्यक्ष हरिश आलिमचंदानी यांच्यासोबत राज्याच्या आरोग्य विभागातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संकल्प इंडिया फाउंडेशन बंगलुरुचे अध्यक्ष राकेश धान्या, राहुल शर्मा, नागपुरातील विक्की रुघवानी आणि हिमोफिलीया फेडरेशनचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत गंभीर स्वरूपाच्या या आजारांवर विस्ताराने चर्चा करून यावरील उपचारासाठी ठोस उपाययोजना करण्याची शिफारशी केल्या. या आजारांना विमा कवच देण्यात यावे, थॅलेसिमीयाग्रस्त बालकांसाठी उच्च दर्जाची औषधे जसे डेसिरोक्स, केल्फर, फैक्टर 8, फैक्टर 9 आणि बालकांच्या बीएमटीसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता अनुदान इतर राज्यात देण्यात यावी.अकोला आणि नागपुर येथे बीएमटी सेंटर सुरु करणे, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सर्व उपचार सुविधांनी सुसज्ज 30 पलंगाचे स्वतंत्र वार्ड करुन मोफत वैद्यकीय उपचार, शाळा आणि महाविद्यालयात थॅलेसिमीया तपासणी, नवविवाहीत जोडप्याला विवाह प्रमाणपत्र देण्यापूर्वी थॅलेसिमीया तपासणी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करणे, थॅलेसिमीया पिडीत बालकांसाठी रेल्वे आणि एसटी बस प्रवासात सुट, वयाच्या 18 वर्षांनंतर त्यांना शासकीय व निमशासकीय कार्यालयात रोजगार उपलब्ध करून देणे इत्यादी अनेक मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा करून, यावर नेमक्या उपाय योजना लागू करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग संचालक डॉ.म्हैसाळकर, आरोग्य सेवा अतिरिक्त संचालक डॉ.केंद्रे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाचे मंगेश चिवटे, ऋषी देशमुख व डॉ. सावळे उपस्थित होते.
दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष कडू यांनी एकुणच मुद्दे लक्षात घेऊन थॅलेसिमीया, हिमोफिलीया, सिकलसेल या गंभीर आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याकरिता केलेल्या कारवाईबाबत हरीशभाई आलिमचंदाणी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.