अकोला दिव्य न्युज ब्युरो : महायुतीत बारामती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून बारामतीच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. अजित पवारांचे सातत्याने बारामती तालुक्याचे दौरे, विकासकामांचा आढावा, नव्या कामांचं भूमिपूजन, उद्घाटन असे कार्यक्रम चालू आहेत. बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार गटात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी भाऊ आणि बहिणीत स्पर्धा रंगणार आहे. अजित पवार हे त्यांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. महायुतीतले तिन्ही पक्ष बारामतीत अजित पवारांच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी मेहनत घेतील, अशी सध्या तरी शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीवरून भाजपाने अजित पवारांना इशारा दिला आहे.
इंदापूरचे माजी आमदार आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या तथा पुणे भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी अजित पवार यांना निवडणुकीपूर्वी इशारा दिला आहे. अंकिता पाटील म्हणाल्या, आम्ही पूर्वी आघाडीत होतो आणि आता महायुतीत एकत्र आहोत. मागच्या तिन्ही वेळेस अजित पवार यांनी आम्हाला शब्द देऊन फिरवला आहे. त्यांनी आमची फसवणूक केली आहे. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आमचे जे उमेदवार जाहीर (इंदापूरमध्ये) होतील त्या उमेदवारासाठी ते आमची मदत करणार असतील, विधानसभेला ते आमची मदत करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचं काम करू.
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्ता भरणे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी इंदापुरात मेहनत घेतली होती. अजित पवारांनीच भरणे यांना जिंकवलं असं स्थानिक राजकारणात बोललं जात. आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार दोघेही महायुतीत आहेत. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांचे पूत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक आम्ही लढवणार आणि जिंकणार असा शड्डू ठोकला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापुरात पाटील विरुद्ध पवार संघर्षाला सुरुवात होऊ शकते.