अवघ्या दोन महिन्यांवर देशातल्या सार्वत्रिक निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू होईल. त्यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांमध्ये चर्चा आणि तिकिटासाठी सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांमधून नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल होत असल्याचं दिसत आहे. त्यावर येणाऱ्या लोकांना दिलेल्या संधींमुळे पक्षातल्या निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
चिन्मय भांडारी यांनी या पोस्टमध्ये त्यांचे वडिल अर्थात माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. त्याचबरोबर माधव भांडारी यांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केलं आहे. मात्र, यानंतर त्यांनी पक्षाकडून माधव भांडारींना जे अपेक्षित फळ मिळायला हवं होतं, ते मिळालं नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. माधव भांडारींचं नाव आजपर्यंत १२ वेळा विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आलं, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळालं नसल्याची खंत या पोस्टमध्ये मांडण्यात आली आहे.
“माझ्या वडिलांनी १९७५ साली जनसंघ किंवा जनता पक्षात प्रवेश केला. आता त्या गोष्टीला ५० वर्षं उलटली आहेत. त्यानंतर फक्त पाच वर्षांत, म्हणजे १९८० साली जनसंघाचं रुपांतर भारतीय जनता पक्षात झालं. माझ्या वडिलांना अनेकजण भाजपाचे एक आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखतात. पण ते याहून खूप काही आहेत आणि त्यांनी याहून खूप काही केलं आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“दुर्दैवाने त्यांना केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं”“पक्षासाठी, जनतेसाठी काम करत असताना ते प्रसिद्धीच्या वलयापासून लांब राहिले. त्यांनी कधीच त्यांच्या पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केला नाही. पण दुर्दैवाने त्यांना कायमच केलेल्या कामाचं अत्यंत कमी फळ मिळालं”, असा मुद्दा या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
१२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग“मी माझ्या आयुष्यात १२ वेळा त्यांचं नाव विधानसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चेत आल्याचं पाहिलं आहे. आणि एकदाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मला आजघडीला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. पण मला या सगळ्यातून वारंवार आशाही वाटते आणि त्याच्या वेदनाही होतात. पुन्हा पुन्हा”, अशा शब्दांत चिन्मय भांडारी यांनी पोस्टमध्ये खंत व्यक्त केली आहे.