अकोला दिव्य न्युज ब्युरो : धर्माच्या तसेच जातीपातीच्या आडून राजकारण करण्यापेक्षा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सोयाबीन व कापसाच्या हमीभावावर ठोस निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या वेदना व समस्या जाणून घेण्यासाठी शासनकर्ते सपशेल कुचकामी ठरल्यामुळेच शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने १५ फेब्रुवारीपासून जिल्हाभरात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निसर्गाने कितीही अवकृपा केली तरीही शेतकरी हार मानत नाही. तर काबाड कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला हमीभाव देण्याची जबाबदारी ही शासनकर्त्यांची असते; परंतु शासनकर्त्यांकडूनच शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक मोठ्या नेत्यांनी कापूस, सोयाबीन व इतर पिकांना हमीभाव मिळावा यासाठी कापूस दिंडी काढली होती. त्यावेळी सोयाबीनला सहा हजार रुपये व कापसाला आठ हजार रुपये दर मिळावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केली होती. आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे, असे असतानाही सोयाबीन व कापसाला हमीभाव का मिळत नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात पायदळ शेतकरी संघर्ष यात्रा काढली जात असल्याची माहिती आमदार तथा जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. संघर्ष यात्रेदरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार दाळू गुरुजी, मा. आमदार हरिदास भदे, मा. आमदार संजय गावंडे, सेवकराम ताथोड शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील. पत्रकार परिषदेला वरिष्ठ नेते सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, मंगेश काळे, ज्ञानेश्वर म्हैसणे, योगेश्वर वानखडे, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, संजय शेळके,शहर प्रमुख अकोला पूर्व राहुल कराळे, आनंद बनचरे ,निरंजन बंड, नितीन ताथोड आदि उपस्थित होते.