अकोला दिव्य न्युज ब्युरो : शस्त्रांची तस्करी करणाऱ्या तिघांना अकोला येथे पोलिसांनी बंदूक व काडतुसांसह अटक केल्यानंतर यातील एका आरोपीने अनमोल बिष्णोई याच्यासोबत ऑडीओकॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे तपासात प्रथमदर्शनी समोर आले आहे.यामुळे शस्त्रांची तस्करी नेमकी कशासाठी ? व्हिडिओ कॉल मध्ये लॉरेन्स बिष्णोई सारखा दिसणारा तोच आहे का? अधिक आरोपी या प्रकरणात आहेत का? ही टोळी कधी पासून सक्रिय आहे अशा अनेक प्रश्नांची आता तपासात उकल होण्याची शक्यता दिसत आहे.
अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याच्या पुलाखाली केशरी रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोघांजवळ बंदूक असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पीएसआय जवरे यांनी कारवाई करीत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ एक रिकामे मॅक्झिन मिळाले.पोलिसांनी या आरोपींची आणखी चौकशी केल्यानंतर आरोपींनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे व नऊ जीवंत राऊंड जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अजय तुलाराम देठे (27) रा. धोबीपुरा अकोट आणि प्रफुल्ल विनायक चव्हाण (25) रा. अडगांव बु.यालाही बेड्या ठोकल्या.
तपासात ‘मास्टरमाइंड’ असलेला तिसरा आरोपी अकोट तालुक्यातील नेवरी येथील रहिवासी शुभम रामेश्वर लोणकर (25) याचा शोध पोलिसांनी सुरू केला. त्याला पोलिसांनी भालेकर वस्ती वारजे, पुणे येथुन अटक केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शुभम लोणकर याच्या मोबाईलवरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल केल्याचा पुरावा सापडला आहे.लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईसोबत ऑडीओ कॉल व इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. अकोट पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, अकोट पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक राजेश जवरे, उपनिरीक्षक अख्तर शेख, उपनिरीक्षक गोपाल जाधव, हेडकॉस्टेबल चंद्रप्रकाश सोळंके, कॉस्टेबल विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पचांग, रवी सदांशिव, सागर मोरे, कपील राठोड, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, चालक उपनिरीक्षक वासुदेव धर्मे, चालक संदीप तायडे यांनी ही कारवाई केली.