अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय समोर ठेऊन, मिळालेल्या संधीचे सोने करावे. पाठ्यपुस्तकासह अवांतर वाचन व मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यांचे जीवनात अनन्यसाधारण महत्व असून इयत्ता ८ ते १० वीचे वर्गशिक्षक माधव मूनशी यांच्या मार्गदर्शनातून मिळालेल्या प्रेरणेतून मी येथपर्यंत पोहचलो आहे.असे प्रतिपादन यवतमाळ टीपेश्वर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी विद्यार्थी मंगेश बाळापुरे यांनी केले. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ मांडवगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून सचिव श्रीकृष्ण अमरावतीकर, शाळा समन्वय समिती अध्यक्ष सहदेवराव रोठे तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मोरे उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यवतमाळ येथील टीपेश्वर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी विद्यार्थी मंगेश बाळापुरे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी मंगेश बाळापुरे यांचा परिचय अलका मुंढे यांनी करून दिला मुख्याध्यापक माधव मुंशी यांनी प्रास्ताविकातून विविध उपक्रमांचे, स्पर्धा, क्रीडा शैक्षणिक सहल यासह शाळेची माहिती दिली.
त्यानंतर शैक्षणिक सत्र 2022-23 मधील शालांत परीक्षेत यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभात यशस्वी विद्यार्थ्यामध्ये इयत्ता दहावीतील प्रथम : तुषार राजेश धुरिया ९०.२० टक्के द्वितीय : स्वप्नील बाबाराव लांजेवार ८९ टक्के तृतीय : प्रेम राजेश दुसाणे ८७.४० टक्के मुलीमधून प्रथम : श्रेया पवार ८७.२० तर बारावीतील विज्ञान विभागातील प्रथम : शर्वरी विनायक जामकर, कला विभागातील प्रथम : स्वाती पंडित सांगळे, मराठी व इंग्रजी भाषेतून प्रथम : वेदांत नितेश वडस्कर, इंग्रजी भाषेतून प्रथम ऋतुजा कैलास अकोत, मराठी भाषेतून प्रथम पल्लवी मनोज बौरासी यांचा सत्कार करण्यात आला.
यासोबतच कला गुणांना प्रेरीत करणे तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या शाळेचा हस्तलिखित अंक ज्योतीचे प्रकाशन पार पडले. त्यातील अंतरंग परिचय संपादक गोपाल सांगूनवेढे यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे मंगेश बाळापुरे यांनी मनोगतातून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पुढील वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांकरीता त्यांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ रोख ५ हजाराचे पारितोषिक जाहीर केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन मिलिंद घोगले, श्रीकांत रत्नपारखी आणि आरती मुळे यांनी केले. आभार तुषार उज्जनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता विज्ञान रेलकर, उपमुख्याध्यापक, अलका मुंढे व अंजली दंडे, मोकाशी, बांगरसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.