अकोला दिव्य न्युज ब्युरो : नितीशकुमार यांनी आज सायंकाळी ९ व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नितीश कुमारांनी बिहारमध्ये असलेली महागठबंधन तोडून एनडीएत जाण्याचा निर्णय घेत, सकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दुपारी भाजपाच्या पाठिंब्याचं पत्रही राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. त्यानुसार, थोड्वेया वेळापुर्वी नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमारांवर टीकास्र डागलं आहे. बेगुसराच्या जी. डी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते.“गेल्या वर्षभरापासून सांगतोय की नितीश कुमार कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. अशी वक्तव्ये मी सातत्याने कॅमेरासमोर करतोय. लोकांना माहितेय की नितीश कुमार पलटूराम आणि पलटूरामांचे सरदार आहेत, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.आज हे सुद्धा सिद्ध झालं की नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपावाले तितकेच पलटूराम आहेत, जितके नितीश कुमार आहेत.
भाजपा चार महिन्यांआधी म्हणत होतं की बिहारमध्ये नितीश कुमारांसाठी भाजपाचा दरवाजा बंद आहे, परंतु, त्यांनी आता हाच दरवाजा नितीश कुमारांसाठी उघडला आहे. कालपर्यंत ज्या नितीश कुमार यांना भाजपा समर्थक शिव्या घालत होते, आज त्यांनाच सुशासनाचे प्रणेते म्हणत आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.